प्रतिनिधी /वास्को
येत्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी शुकवारी मुरगाव तालुक्यात पाऊल ठेवले. वास्को शहरातील श्री देव दामोदराचे दर्शन घेऊन पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष मुरगाव तालुक्यातील विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत, सहचिटणीस जॉन नाझारेथ व पक्षाचे नेते अकबर मुल्ला उपस्थित होते.
मुरगाव तालुक्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे अस्तित्व नाही. यापूर्वीही या पक्षाने मुरगाव तालुक्यात निवडणुक लढवलेली नाही. आता मात्र, गोवा फॉरर्वडने मुरगाव तालुक्याकडे आपले लक्ष वळवले आहे. येणाऱया विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या पक्षाने मुरगाव तालुक्यात चाचपणी करण्यास सुरवात केलेली असून गोवा फॉरवर्डही आपले उमेदवार उभे करणार आहे. शुक्रवारी दुपारी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार किरण कांदोळकर व त्यांच्या इतर नेत्यांनी वास्कोत दाखल होऊन दामोदर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर या तालुक्यातील राजकीय प्रवासाची सुरवात केली. विशेष म्हणजे गोवा फॉरर्वडच्या नेत्यांनी माजीमंत्री व गोवा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुझो फिलीप डिसोजा यांची दाबोळीत भेट घेऊन त्यांच्याशी राजकीय चर्चा केली. मंदिरासमोरच काँग्रेसचे नेते सैफुल्ला खान आणि या नेत्यांची गाठभेट व चर्चा झाली.
मुरगाव तालुक्यातही गोवा फॉरवर्ड निवडणुक लढवणार – किरण कांदोळकर
यावेळी गोवा फॉरर्वडचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी माध्यमांशी बोलताना मुरगाव तालुक्यात पक्षाचे अनेक हितचिंतक असून या तालुक्यातही लक्ष घालावे अशी मागणी त्यांच्याकडून होत असे. त्यांच्या आग्रहावरूनच आम्ही राजकीय तयारीसाठी मुरगावात दाखल झालेलो असल्याचे सांगितले. पक्षाचे हितचिंतक, मित्र वर्ग तसेच इतर काही लोकांना भेटणार व चर्चा करणार आहे. मुरगाव तालुक्यातील मतदारसंघांसाठी आमच्या मनात काही उमेदवार आहेत. तर काही उमेदवारांनी स्वतःहून उत्सुकता दाखवलेली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पक्ष चाचपणी करीत आहे. येणाऱया काळात उमेदवार जाहीर करू. चार किंवा दोन मतदारसंघात आमचे उमेदवार असतील असे कांदोळकर म्हणाले. मुरगावातील चारही मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे इतर पक्ष या मतदारसंघावर थेट दावा करू शकत नाही. मात्र, भाजपाविरोधात इतर प्रमुख राजकीय पक्षानी एकत्र यावे असे आपल्याला वाटते. भाजपाला सत्तेवरून हटवण्यात यावे अशी गोव्याच्या जनतेची भावना असून ती भावना घेऊन गोवा फॉरवर्ड पुढे जात आहे. इतर पक्षानीही या भावनेचा आदर करायला हवा असे कांदोळकर म्हणाले.