प्रतिनिधी / पणजी
काँग्रेसची गोवा फॉरवर्डशी युती झाली नसल्याचा दावा पक्षाचे मुख्य निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी केला असून गोवा फॉरवर्डने काँग्रेस पक्षाला भाजपच्या पाडावासाठी पाठिंबा दिला आहे. तो पाठिंबा काँग्रेस नेते राहूल गांधी यानी स्वीकारल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या गट समित्यांनी 36 उमेदवारांच्या नावाची शिफारस केल्याचे ते म्हणाले. फुटीरांना उमेदवारी आणि काँग्रेस पक्षात स्थान नाही, असा पुनरुच्चार चिदंबरम यांनी केला.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी सांगितले की, प्रियांका गांधी या आज शुक्रवारी दक्षिण गोव्यात येत असून त्या प्रियदर्शिनी मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. गोव्यात महिलांचे अनेक प्रश्न असून महागाई वाढीने त्यांचे कंबरडे मोडले आहे. महिलांनी त्या मेळाव्यास मोठय़ा संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन चिदंबरम यांनी केले.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करावी म्हणून प्रदेश निवडणूक समिती स्थापन केली असून तिची अधूनमधून बैठक होणार आहे. उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून गट समित्यांनी नावांची शिफारस केली आहे. विविध निकष लावून उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
चोडणकर यांनी एका आमदाराचे व एका मंत्र्याचे जे प्रकरण उघड केले आहे ते पूर्ण जबाबदारीने केले असून त्याबाबत जर कोणी कायदेशीर कारवाई करीत असेल तर अवश्य करू दे, अशा कारवाया काँग्रेस पक्षाने पचवल्या असून त्यास आम्ही भीक घालत नाही, असे चिदंबरम यांनी नमूद केले. केवळ काँग्रेस पक्षच भाजपला पराभूत करू शकतो, असा दावा करून ते म्हणाले की, ज्या पक्षांना काँग्रेसला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी तो द्यावा. भाजपा विरोधात सर्व विरोधी पक्षांची आघाडी व्हावी असे मत त्यांनी प्रकट केले.
काँग्रेस प्रचार कार्यालयात उद्या बैठक
काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांना शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पाटो पणजी येथील काँग्रेस प्रचार कार्यालयात पाचारण केले आहे. तेथे गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, गुंडू राव व इतर पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.