कोणतीही ऑफर नाही, भाजपमधील कुणी संपर्कात नाही
प्रतिनिधी / मडगाव
भाजपाचा कोणताही नेता माझ्या संपर्कात वा मी भाजपाच्या संपर्कात नसून मला पक्ष भाजपात विलीन करण्याची कोणतीही ऑफर नाही. ही जी काय चर्चा चालली आहे ती निव्वळ अफवा असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात जो काय निर्णय घ्यायचा असेल तो माझ्या मतदारांना व समर्थकांना विश्वासात घेऊनच मी घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पक्ष विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गोवाभर चालू आहे. यासंदर्भात सरदेसाई यांचे मत जाणले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या आपण गप्प आहे. कारण ही आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. पत्रकारांसह सर्वांनी आत्मचिंतन करायला हवे, असे ते म्हणाले.
आपण माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना पाठिंबा दिला असता घाईगडबडीत निर्णय घेतला होता. मात्र आता कोणताही निर्णय घेताना विचार करून व मतदार तसेच समर्थकांचे मत जाणून घेऊनच पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सध्या पत्रकारांकडे खाद्य नसल्याने तेही अशा बातम्या प्रसिद्ध करून त्यात आपले नाव गोवत आहेत. प्रत्यक्षात आपण कोणत्याही भाजप नेत्याला भेटलेलो नाही वा त्यांच्याकडील कोणी आपल्याशी संपर्क साधलेला नाही, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी आत्मचिंतन करावे
राज्यात सरकारविरोधी भावना असताना कौल न मिळाल्याने आम्ही कुठे चुकलो याबद्दल सर्व विरोधकांनी आत्मचिंतन करायला हवे. आमच्या पक्षाने 7 जागा मागितल्या असता तीनच दिल्या गेल्या. तरी आम्ही त्याग केला व दिलेल्या जागांवर समाधान मानले. इतरांनी काय केले याबद्दल त्यांनी आत्मचिंतन करावे, असे ते म्हणाले.