महिन्याभरात पाच रॅकेट गजाआड : मोबाईल, लॅपटॉप, रोकडसह 19 जणांना अटक
प्रतिनिधी / पणजी
आयपीएल सुरू झाल्यापासून गोवा आयपीएल सट्टय़ाचा अड्डा बनल्याचे दिसून येत आहे. सध्या गोव्यातून मोठय़ा प्रमाणात आयपीएल सट्टा सुरू असून या महिन्याभरात पोलिसांनी मोरजी, बागा, कळंगुट, कांदोळी व ताळगांव या ठिकाणी धडक कारवाई करून बेटिंगची पाच
रॅकेट्स उघड करुन अनेकांना गजाआड केले आहेत. देशभरातील सट्टेबाजाना गोवा हे सुरक्षित ठिकाण वाटत असल्याने ते पर्यटक म्हणून गोव्यात येतात आणि सट्टेबाजीचा बेकायदेशीर व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी रात्री गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) ताळगाव येथे केलेल्या कारवाईत सट्टेबाजी रॅकेट गजाआड केले आहे. या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल लॅपटॉप व इतर साहित्य मिळून दोन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. सीआयडी निरीक्षक दत्तगुरु सावंत व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.
ताळगावच्या चामुंडा रेसिडेन्सीमध्ये रॅकेट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांमध्ये रणजित छाब्रा, सुनील मोटावनी, कपिल तोलानी व विनय गंगवानी (चौघेही छत्तीगड येथील) यांचा समावेश आहे. ताळगाव येथील चामुंडा रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटमध्ये चौघेही सट्टेबाजी करीत होते.
आयपीएल सुरु झाल्यापासून त्यांनी सुमारे 50 लाख रुपयांची सट्टेबाजी केली आहे. आपल्या राज्यातील लोकांशीच ते सट्टेबाजी करीत होते असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
शनिवारी कळंगुटमधील रॅकेट उद्ध्वस्त
कळंगुट पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत पाच परप्रांतीय सट्टेबाजांना पंचवीस हजार रुपये तसेच 15 महागडे मोबाईल संच आणी तीन लॅपटॉपसह अटक केली होती. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री बागा-कळंगुट येथील तवा-पॅलेस या नामांकित हॉटेलच्या रुमवर करण्यात आली होती. मनोज थडानी (39, इंदोर), बंटी डांगी (32, इंदोर), चिंटु धोयध्याय (21, इंदोर), रुपेश सिंग (32, मुंबई), जगदीश नेपाळी (47, नेपाळ) यांना कळंगुट पोलिस पथकाकडून रंगेहात अटक केली होती. सिएसके चेन्नई व रॉयल चॅलेजर्स (बंगळुरु) यांच्यात खेळल्या जाणाऱया सामन्यावरुन ही सट्टेबाजी चालली होती. आयपीएल सट्टेबाजीविरुद्ध कळंगुट पोलिसांकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची तिसरी कारवाई आहे.
गुरुवारी मोरजीतील छाप्यात तिघांना अटक
सीआयडी पोलिसांनी मोरजी येथे केलेल्या कारवाईत आयपीएल सट्ट्sबाजीप्रकरणी तिघांना यापुर्वी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लॅपटॉप 8 मोबाईल फोन, एलइडी टीव्ही तसेच रोख रक्कम 19,200 जप्त केले होते. अटक केलेल्या संशयितामध्ये संदीप पटेल, कृष्णकांत व भोजा भोपाल यादव यांचा समावेश होता. तिघेही हैद्राबाद येथील आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली होती. मुंबई इंडियन्स व पंजाब यांच्यात सुरु असलेल्या सामन्याच्या दरम्यान त्यांची सट्टेबाजी सुरु असताना सीआयडीने कारवाई करून संशयितांना अटक केली.