राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
प्रतिनिधी / सोलापूर
गोवा राज्य बनावटीचा सुमारे 43 लाख 93 हजार रुपयाचा मद्यसाठा सोलापूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने पकडून त्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह दोघांना अटक केली आहे.
ही कारवाई उस्मानाबाद-वाशी महामार्गावरील शिवनेरी ढाब्यासमोर करण्यात आली. ट्रकचालक महेश हरेसिंग अजनारे (वय 31) व कान्हा राधेश्याम चारल (वय 24, दोघे रा. मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही वाशी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उस्मानाबाद-वाशी या महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा लावला होता. त्यावेळी शिवनेरी ढाब्यासमोरून एक टाटा कंपनीची दहा चाकी मालवाहू ट्रक (क्र.एम. पी. 09/ एच.एफ.8904) जात होती. यावेळी सदर ट्रक अडवून तपासणी केली असता त्यात गोवा राज्य बनावटीचा विक्रीसाठी असलेला रॉयल ब्लू व्हीस्कीचा 575 बॉक्सचा साठा आढळून आला. याबाबत ट्रक चालकाकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मद्याचा हा साठा ट्रकसह जप्त करण्यात आला व ट्रक चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई निरीक्षक मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, जवान मलंग तांबोळी, चेतन व्हनगुंटी, गजानन होळकर, अमोल चिलगर, सुभाष रणखांब, विशाल वस्ताव यांनी पार पडली. या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यात येत आहे.