15 बाजार तर 12 मार्केट यार्ड खुली : 300 टन काजू खरेदी : अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर यांची माहिती
प्रतिनिधी / फोंडा
लॉकडाऊनच्या काळात गोवा बागायतदार खरेदी विक्री संस्थेने किराणा माल व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे 15 बाजार खुले ठेवले असून आत्तापर्यंत 450 टन मालाचा ग्राहकांना पुरवठा केला आहे. तसेच 9 एप्रिलपासून गेल्या तीन दिवसांत 300 टन म्हणजे 30 हजार किलो काजू बिया खरेदी केल्या आहेत. संस्थेकडे जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी येताना सोशल डिस्टसिंग व आवश्यक ती खबरदारी घेऊन संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केले आहे.
शनिवारी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नितीन सामंत व व्यवस्थापकीय संचालक उल्हास उमर्ये हे उपस्थित होते. गोवा बागायतदारचे फोंडय़ासह विविध तालुक्यातील 15 किराणा बाजार ग्राहकांसाठी खुले असून सकाळी 8.30 ते सायं. 4 वा. यावेळेत ग्राहकांना खरेदी करता येईल. मात्र कोरोना संसर्गासंबंधी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून स्वयंसेवा बंद करण्यात आली आहे. ग्राहकांना सुरक्षित अंतरावर रांगेत थांबून आपल्या सामानाची यादी कर्मचाऱयांकडे द्यावी लागेल. यादीनुसार सामान काढून दिले जाईल, असे सावईकर यांनी सांगितले.
काजू खरेदी व्यावहारासाठी गोवा बागायतदारच्या एकूण 12 मार्केट यार्डवर 9 एप्रिलपासून खरेदी सुरु करण्यात आली आहे. सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 वा. यावेळेत ही सेवा सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत साधारण 300 टन म्हणजे 30 हजार किलो काजू बियांचा खरेदी व्यवहार झाल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या प्रति किलो रु. 105 या प्रमाणे काजूचे दर असून बागायतदारांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक व इतर अनेक अडचणी असतानाही कर्मचाऱयांनी चांगली सेवा दिल्याचे सावईकर यांनी सांगितले. गोवा बागायतदार ही 54 वर्षांपासून बागायती माल खरेदी करीत असून लॉकडाऊनच्या काळात खरेदी विक्री व्यावहारातील मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन सर्व सभासद व बागायतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन नरेंद्र सावईकर यांनी केले आहे.