काणकोणच्या टॅक्सीचालकांची कैफियत, उपसभापतींना साकडे
प्रतिनिधी / काणकोण
गोवा माईल्स ऍप नावाने गोव्यात चालू असलेल्या टॅक्सी व्यवसायाने गोव्यातील पारंपरिक टॅक्सीचालकांच्या तोंडचा घासच काढून घेतला असून आमच्यावर उपासमारीची पाळी आणली आहे. या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करणाऱया टॅक्सीचालकांवर आज बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी इतरांसमोर हात पसरण्याची पाळी आलेली आहे, अशी कैफियत काणकोणच्या टॅक्सीचालकांनी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्यासमोर मांडली असून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
काणकोणच्या विविध भागांमध्ये व्यवसाय करणाऱया 100 पेक्षा अधिक टॅक्सीचालकांनी उपसभापतींची भेट घेऊन गाऱहाणे सादर केले. या तालुक्यात पाळोळे, तारीर, पाटणे, होवरे, खोल, आगोंद, गालजीबागसारख्या भागांमध्ये मिळून 700 पेक्षा अधिक टॅक्सीचालक आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन या व्यावसायिकांनी टॅक्सी खरेदी केलेल्या आहेत. मागच्या वर्षात कोविड-19 च्या महामारीमुळे तालुक्याकडे पर्यटकांनी पाठ फिरविली. त्यावेळी या टॅक्सीचालकांचा व्यवसाय पूर्णपणे खंडित झाला, याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
आता नुकताच कोठे पर्यटन हंगाम सुरू झालेला असताना गोवा माईल्सचे टॅक्सीचालक हा व्यवहार करतात. कमी भाडय़ात फेऱया मारतात. उशीर झाला, तरी ग्राहकांची वाट पाहत बसतात. इतकी वर्षे आम्ही हा व्यवहार सांभाळला. यापुढे करायचे तरी काय असा प्रश्न समोर आला असून या प्रकाराला सरकारचा छुपा पाठिंबा आहे. टॅक्सीचालकांनी मुख्यमंत्री, वाहतूकमंत्री तसेच स्थानिक आमदारांना यासंबंधीचे निवेदन सादर केलेले असून आमच्या संघटनेला न्याय मिळाला नाही, तर कायदा हातात घेऊ, असा इशारा काणकोणच्या खासगी टॅक्सीचालकांनी दिला आहे. गोवा माईल्सने रिक्षाचालकांचा व्यवसाय देखील हडप केला असल्याचा आरोप या चालकांनी केला आहे.