पर्यटक टॅक्सीमालक हताश,वाहतूक संचालकांनी भेट टाळली,पोलिसांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील स्थानिक टॅक्सी मालक व चालक आणि गोवा माईल्स या टॅक्सी सेवा पुरवठादार यांच्यातील वाद दिवसेदिवस जटील होत चालला असून गोवा माईल्स रद्द करा या मागणीसाठी बुधवारी टॅक्सी मालकांनी वाहतूक खात्यासमोर जोरदार निदर्शने केली.
गोवा माईल्सला विरोध दर्शविण्यासाठी सकाळी शेकडोच्या संख्येने टॅक्सी मालकांनी वाहतूक खात्याचे कार्यालय असलेल्या शहरातील जुन्ता हाऊस इमारतीसमोर गर्दी केली होती. परंतु मोठय़ा प्रमाणात उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना संचालक राजन सातार्डेकर यांच्या कार्यालयात जाण्यापासून रोखले. तसेच वाहतूक संचालक कार्यालयात नसल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संचालकांना भेटल्याशिवाय हलणारच नाही, असा निर्धार व्यक्त करत सर्व टॅक्सीमालक दुपारपर्यंत तेथेच ठाण मांडून राहिले.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर यांनी, गोवा माईल्स रद्द करा या मागणीसाठी आम्ही अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे प्रयत्न केले. परंतु ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वाहतूक संचालकांना भेटण्यासाठी आलो होतो. परंतु तेही पळपुटेपणा करत आम्हाला टाळत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मर्यादित प्रतिनिधींचे शिष्टमंडळ संचालकांना भेटण्यासाठी पाठविण्याचे ठरले. त्यानुसार शिष्टमंडळ कार्यालयात गेले असता त्यांना साहाय्यक संचालकांना भेटण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांच्याशी चर्चा करण्यास सर्वांनी नकार दिला व आपल्या मतावर ठाम राहिले. शेवटी 2 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता भेटण्याची वेळ मिळाल्यानंतर निदर्शक माघारी फिरले.
बसमालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी या निदर्शकांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी गोवा माई&ल्स हे ऍप मुळातच बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीसाठी सरकारने समिती नियुक्त करावी, अशी मागणी केली.