यंदाच्या मुक्तीदिनापासून वर्षभर भरगच्च कार्यक्रम
प्रतिनिधी/ पणजी
गोवा मुक्तीचा षष्टय़ब्दी वर्धापनदिन न भूतो भविष्यती असा साजरा करण्याची योजना सरकारने आखली असून त्यानिमित्त वर्षभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याद्वारे गोवा मुक्तीसंग्रामातील आठवणीसह राज्याची कला-संस्कृती, खाद्य संस्कृती, लोकसंस्कृती, इतिहास, क्रीडा, अन्य परंपरा, ग्रामीण पर्यटन, यासंबंधीचे विविधरुपी कार्यक्रम देशभरात आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्राकडे 100 कोटी खास निधीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या
वर्षभर होणाऱया कार्यक्रमांच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या निवडण्यात आल्या असून उपाध्यक्ष म्हणून केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह अन्य दोन्ही खासदार, तसेच सर्व आमदार, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, माजी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि राज्यातील काही प्रतिष्ठित, विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटना व अन्य संघटनांचे पदाधिकारी, अनेक संस्थांचे उच्च अधिकारी, इतिहासकार, उद्योगपती, उद्योजक, यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या समितीचा कार्यकाळ एका वर्षासाठी असेल.
समितीची पहिली बैठक 3 किंवा 4 डिसेंबरला
या समितीची पहिली बैठक 3 किंवा 4 डिसेंबर रोजी होणार असून त्यावेळी सध्या आखणी करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा आराखडा सादर करून अंतिम मान्यता देण्यात येईल. तत्पूर्वी गोमंतकीयांनी आपल्या काही सूचना दिल्यास त्यांचे स्वागत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्व राज्ये, संघप्रदेशांच्या राजधान्यांमध्ये कार्यक्रम
षष्ठय़ब्दीचा पहिला कार्यक्रम 19 डिसेंबर रोजी सकाळी प्रमुख कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी आझाद मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. पुढील वर्षभरात राज्याच्या प्रत्येक तालुक्यात आणि पंचायत, पालिका पातळीवर कार्यक्रम होणार आहेत. त्याशिवाय दिल्लीसह अन्य सर्व राज्यांच्या राजधानी, संघप्रदेशात किमान एकतरी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्याद्वारे राज्याची संस्कृती आणि पर्यटनाची जाहिरात करण्याचे प्रयत्न होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यासाठी लढलेल्या देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान
गोव्याच्या मुक्तीसंग्रामात गोव्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या अन्य राज्यांतील स्वातंत्र्यसैनिकांनीही योगदान दिले होते. त्या संबंधित राज्यात होणाऱया कार्यक्रमावेळी अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध अशा गोमंतकीय साहित्यिकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
दिल्लीत होणार गोमंत दर्शनचा विशेष सोहळा
दिल्लीत होणाऱया कार्यक्रमात गोवा मुक्तीसंग्रामाचा इतिहास, मुक्तीसंग्राम, संस्कृती, भविष्यातील व्हिजन, यावर चर्चा, व्याख्याने, स्पर्धा होणार आहेत. ’आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’, ’मेक इन गोवा’, ’व्होकल फॉर गोवा’, या संकल्पनांस याद्वारे अधिक बळकटी देण्याचे प्रयत्न होणार आहेत. त्याशिवाय विद्यार्थी, युवक, महिला, यांचाही मोठा सहभाग कार्यक्रमात असेल. गोमंतकीयांमध्ये प्रचंड बुद्धीमत्ता असल्यामुळे सर्व कार्यक्रमात गोमंतकीयांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्यावर अद्याप कोरोनाचे सावट असले तरीही पुढील वर्षात ते नियंत्रणात येईल, त्यामुळे कार्यक्रमांच्या आयोजनात कोणताही अडथळा येणार नाही, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.