प्रतिनिधी / मडगांव
गोवा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू पद्मभूषण डॉ. पद्माकर रामचंद्र दुभाषी यांचे काल सोमवारी 31 रोजी सकाळी पुण्यात वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. भारतीय विद्याभवन पूणे केंद्राचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. ते एक कुशल भारतीय नागरी सेवक, प्रशासक, लेखक, सामाजिक वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ञ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, कन्या, स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दुःख व्यक्त केले आहे.
गोवा विद्यापीठाचे नवीन कॅम्पसमध्ये स्थलांतर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दुभाषी यांची प्रकृती शनिवार 29 ऑगस्टपर्यंत उत्तम होती. गेल्या आठवडय़ात त्यांनी भारतीय विद्या भवनचे कामकाज पाहून महत्वाच्या निर्णयांवर स्वाक्षऱया केल्या होत्या. मात्र, शनिवारी दुपारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. दुभाषी यांचा मुलगा विदेशात असून, मुलगी पुण्यात आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर सोमवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. दुभाषी यांनी 1953 मध्ये प्रशासकीय सेवेत काम सुरू केले. त्यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत राज्य व केंद्र शासनात विविध पदांवर काम केले. गोवा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. 1990 ते 1995 या काळात त्यांनी विद्यापीठाचे कामकाज पाहिले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी प्रशासन, राज्यशास्त्र, अर्थ आदी विषयांवर 27 पुस्तके लिहिली. त्यामध्ये 6 मराठी पुस्तकांचा समावेश आहे. प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या 12 वर्षापासून ते भारतीय विद्याभवन पुणे केंद्राचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता.