प्रतिनिधी/ पणजी
गोवा राज्याचा 60 वा मुक्तीदिन म्हणजे षष्ठय़ब्दी महोत्सव वर्षभर मोठय़ा धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून येत्या 19 डिसेंबर 2020 रोजी त्याचा शुभारंभ होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी पणजी जिमखाना येथे विशेष कार्यक्रम आखण्यात आला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे त्यासाठी खास पाहुणे या नात्याने उपस्थित राहणार आहेत. वर्षभर चालणाऱया षष्ठब्दी महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हजेरीत होणार आहे.
राष्ट्रपती येणार असल्याचे निश्चित झाले असून ते गोव्यात आल्यानंतर प्रथम आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकास वंदन करतील आणि तेथून ते थेट पणजी जिमखाना येथे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी जातील, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
पणजी जिमखाना येथे शुभारंभी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
षष्ठय़ब्दी सोहळा राज्य समितीच्या काल शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत बोलत होते. आझाद मैदानावर सकाळी मुक्तीदिनाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत पणजी जिमखानावर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. कोरोना संक्रमणामुळे दोन्ही कार्यक्रमांना मर्यादित स्वरुपात एसओपी पाळून प्रवेश देण्यात येणार आहे. 19 डिसेंबर 2020 ते 19 डिसेंबर 2021 असे वर्षभर विविध कार्यक्रम होणार असल्याचे ते म्हणाले.
पंचायत, तालुका पातळीवर विविध कार्यक्रम
संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचा समावेश असलेला आराखडा तयार करण्यात येणार असून तो 10 जानेवारीपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. तालुका तसेच पंचायत पातळीवर विविध कार्यक्रम उपक्रम होणार असून त्यात सर्वांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. हा कार्यक्रम सरकारी असला तरी तो संपूर्ण गोमंतकीय जनतेसाठी कार्यक्रम आहे. तो सरकारी म्हणू नका, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
सांस्कृतिक, ऐतिहासिक, संस्कृतीचे दर्शन घडविणार
‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ ही मोहीम या संपूर्ण वर्षात मुक्तीदिन सोहळ्य़ातही राबवण्यात येणार असून सांस्कृतिक, ऐतिहासिक, पारंपरिक असे संपूर्ण प्रकारचे दर्शन वर्षभरातील कर्यक्रम उपक्रमातून गोमंतकीय जनतेला घडणार आहे. गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा (हयात असलेल्या – नसलेल्या) यथोचित सन्मान करण्यात येणार असून विविध कलाकारांचाही गौरव होणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
प्रेक्षणीय, ऐतिहासिक स्थळांचे नूतनीकरण
गोवा मुक्तीशी संबंधित असलेली राज्यातील विविध प्रेक्षणीय, ऐतिहासिक स्थळांचे पुन्हा एकदा नूतनीकरण होणार असून गोवा स्वतंत्र्य लढय़ाचा ज्वलंत इतिहास पुन्हा एकदा जागवला जाणार आहे. 60 व्या मुक्तीदिन सोहळ्य़ासाठी बोधचिन्ह तयार करण्यात येणार असून त्याची स्पर्धा घेणार असल्याचे ते म्हणाले. ते बोधचिन्ह सर्व कार्यक्रम, स्पर्धा ठिकाणी वापरण्यात येणार आहे. वर्षभरात तालुका ठिकाणी कार्यक्रम होतील.
स्वातंत्र्यसैनिकांचा होणार सन्मान
गोवा मुक्तीसाठी इतर राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांनीही बलिदान दिले. तेथेही त्या राज्यात गोवा मुक्तीदिनाचे वर्षभरात कार्यक्रम होतील. तेथेही हयात असलेल्या – नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
समितीच्या बैठकीस काँग्रेस नेते, मगो नेते, मराठी – कोकणी अकादमी, स्वातंत्र्यसैनिक संघटना, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार अशी सर्व मंडळी उपस्थित होती. त्यांनी चांगल्या सूचना केल्या असून त्यांचा विचार केला जाईल, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
जि.पं. मतदानाची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर
जिल्हा पंचायत निवडणुकीचे मतदान कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून ती या चालू डिसेंबर महिन्यातच घेतली जाईल अशी अपेक्षा डॉ. सावंत यांनी प्रकट केली. मतदानाची तारीख गोवा राज्य निवडणूक आयोग जाहीर करेल, असेही त्यांनी सांगितले. आयोगाला तारीख सूचवण्यात आलेली आहे आणि ती जाहीर करण्याचे काम आयोगाचे आहे. आयोगाने मतदानाची तारीख निश्चित करायची आहे. सरकारने तारीख सूचवली तरी आयोगाला त्यात बदल करता येतो, असेही डॉ. सावंत यांनी पुढे नमूद केले.
राज्यातील खाणी सहा महिन्यात सुरु होतील
गोव्यातील खाणी लवकरात लवकर चालू होण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून येत्या 6 महिन्यात त्या चालू होतील आणि हा प्रश्न सुटेल असे निवेदन डॉ. सावंत यांनी केले. सरकारची त्या दृष्टीने तयारी होत असून केंद्रीय खाण मंत्रालय आणि गोवा खाण खाते यांचा दैनंदिन संपर्कावर भर देण्यात आला आहे. दररोज संपर्क साधून खाणी सुरु करण्याबाबतच्या माहितीची देवाण – घेवाण चालू झाली आहे. हा प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी तो आता ‘फास्ट ट्रक’वर टाकण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.