गोव्यात भ्रष्टाचार नसल्याचे वक्तव्य अंगलट : आलोक कुमार राज्याचे नवे सीबीआय प्रमुख
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात रामराज्य आहे. गेल्या पाच वर्षांत भ्रष्टचाराची तसेच लाचखोरीची एकही तक्रार नाही, असे भाष्य करणारे गोवा विभाग सीबीआय प्रमुख व अधीक्षक आशिष कुमार यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी आलोक कुमार यांची नियुक्ती झाली आहे. आशिष कुमार यांची मुंबई विभागीय प्रशिक्षण केंद्रात पाठवणी केली असून मुंबईचे खास अतिरिक्त अधीक्षक आलोक कुमार यांना गोव्यात पाठवण्यात आले आहे.
आशिष कुमार यांच्या वक्तव्याची गंभीर दखल सीबीआयच्या दिल्ली मुख्यालयाने घेऊन बदलीची कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. गोव्यात भ्रष्टाचार नाही. केंद्रीय सरकारी खात्यात भ्रष्टाचार होत नाही. कोणाची कोणाविरुद्ध तक्रार नाही, असा दावा आशिष कुमार यांनी केला होता. गोव्यातील केंद्रीय सरकारी कार्यालयांना तेथील कर्मचारी, अधिकारी यांना त्यांनी ‘क्लिन चिट’ दिली होती. त्याचे परिणाम त्यांच्या अंगलट आले असून त्यांना तातडीने गोव्यातून बदली करून मुंबईला प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले आहे.