कलम बागेत पाण्याच्या टाकीत पडला होता : जिल्हय़ात ब्लॅक पँथरचा पहिलाच ‘रेस्क्यू’ : नर जातीचा, दीड-दोन वर्षे वयाचा नैसर्गिक अधिवासात सोडले
प्रतिनिधी / कुडाळ:
गोवेरी येथील तुकाराम राऊळ यांच्या आंबा-काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या सात ते आठ फूट खोल पाण्याच्या टाकीमध्ये काळा बिबटय़ा (ब्लॅक पँथर) पडला. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजता घडली.
याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या पथकाने सात ते आठ फूट खोल टाकीमध्ये पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पिंजऱयात घेत सुखरुप बाहेर काढले. भक्ष्याच्या मागे धावत असताना तो विहिरीत पडला असावा, अशी शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात आली. हा बिबटय़ा नर जातीचा असून अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाचा आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सिंधुदुर्गात ‘ब्लॅक पँथर’चा पहिलाच रेस्क्मयू!
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे म्हणाले, काळा बिबटय़ा ही अत्यंत दुर्मीळ बिबटय़ा प्रजात असून जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग काळा होत असतो. जिल्हय़ात ‘ब्लॅक पँथर’चा हा पहिलाच रेस्क्मयू आहे.
बिबटय़ा अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानी
बिबटय़ा हा निशाचर असून बहुतांशी भक्ष्याच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो. त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळणारे प्राणी जसे बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळिंदर, घोरपड, पक्षी, माकडे यापासून ते लहान आकाराची हरणे यावर ते उपजीविका करतात. बिबटय़ा हा अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानी असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक आहे.
काळा बिबटय़ा हा अत्यंत दुर्मीळ असून त्याचे निसर्गातील वास्तव्य हे जिल्हय़ातील जंगलाच्या परिपूर्णतेचे सकारात्मक प्रतीक आहे. कोणताही वन्यप्राणी जखमी अथवा अडकलेल्या स्थितीत आढळून आल्यास तात्काळ वन विभागास माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य
हे बचावकार्य उपवनसंरक्षक (प्रा., सावंतवाडी) शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव, सावंतवाडी) आय. डी. जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (कुडाळ) अमृत शिंदे, वनपाल (नेरुर त. हवेली) धुळू कोळेकर, वनपाल (मठ) अ. स. चव्हाण, वनपाल (मालवण) श्रीकृष्ण परीट, वनरक्षक (नेरुर त. हवेली) सावळा कांबळे, वनरक्षक (मठ) सूर्यकांत सावंत, वाहन चालक राहुल मयेकर यांनी ग्रामस्थ दत्ताराम गावडे, सुशांत गावडे, बाळू खानोलकर, विश्वजीत खानोलकर, अनंत राऊळ, ओंकार जाधव, सतीश गावडे यांच्या मदतीने यशस्वी केले.