क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
भारताचा 67वा आणि गोव्याचा दुसरा ग्रँडमास्टर लिऑन मेंडोंसाचे काल गोव्यात आगमन झाले. दाबोळी विमानतळावर त्याचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक आणि खजिनदार किशोर बांदेकर यांनी स्वागत केले. तब्बल 17 महिन्यांनतर लिओन आपल्या मायभूमीत पोहचला.
मार्च 2020 मध्ये लिऑन स्पर्धेसाठी हंगेरीला गेला होता. मात्र कोरोनामुळे भारतात येणाऱया दुबईतील फ्लाईट्स बंद असल्याने तो हंगेरीलाच राहिला. तिथं त्याने स्पर्धा खेळून बुद्धिबळ खेळातील प्रतिष्ठेचा ग्रँडमास्टरचा किताब मिळविला. ग्रँडमास्टर किताब मिळविल्याबद्दल लिऑनने आनंद व्यक्त केला. आगामी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आणखीही दमदार कामगिरी करण्याची त्याने इच्छा व्यक्त केली.
काल दाबोळी विमानतळावर त्याच्या स्वागताला लिऑनचे कुटूंब तसेच गोवा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष सागर साकोर्डेकर, अरविंद म्हामल, सत्यवान हरमलकर, महेश कांदोळकर, दिलीप वेर्णेकर, स्वप्नील होबळे तसेच स्वीकृत सदस्य व्ही. बाळकृष्ण आदी उपस्थित होते.