प्रतिनिधी/ फोंडा
गोयांत कोळसो नाका या संदेशासह बोरी भागातून विविध पर्यावरणप्रेमी संघटनेने काल शनिवारी दुपारी जनजागृती यात्रा काढण्यात आली. शांततेच्या मार्गाने यात्रेला बोरी पूल येथून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर तिशे बोरी येथील चौगुले कंपनीकडून तिस्क फोंडा येथील आगियार मैदानावर यात्रेचा समारोप झाला. गोयांत कोळसोनाका, रेल्वेचे दुपदरीकरण रोका अशा घोषणबाजीसह बोरी ते फोंडापर्यंत वाहन फेरीही काढण्यात आली.
जनजागृती यात्रेला राज्यभरातील विविध पर्यावरणप्रेमी संघटनानी सहभाग दर्शविला. रेनबो वॉरिअर्स या स्वयंसेवी संघटनेचे अभिजीत प्रभूदेसाई यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना पुढील पिढीसाठी निसर्गसंपन्न गोवा राखून ठेवण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयांना या चळवळीत सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. आज बोरी येथील यात्रेत मंगेशी, बांदोडा, कुंडई, पंचवाडी येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगितले असून यापुढेही हा उत्साह कायम ठेवा असे आवाहन केले.
कोळसा वाहतूक गोव्याचे निसर्गसौदर्य नष्ट करील-फादर गोम्स
पेरीस प्रिस्ट ऑफ बोरी चर्चचे फादर मानुएल गोम्स यांनी आपल्या भाषणात गोव्यातील राजकारणी आपल्या स्वार्थासाठी वावरत असून त्यांना लोकहीताचा विसर पडलेला आहे. कोळश्याच्या आगमनानंतर गोव्याचे निसर्गसौदर्य नष्ट होणार आहेत. गोव्याचे निसर्गसौदर्य व हवामानाची भुरळ पडलेला पर्यटकही कोळसा प्रदुषणामुळे पाठ फिरवणार असल्याचे भाकित केले असून अजून वेळ गेलेला नसून पुढील धोका लक्षात घेता जागे व्हा असा संदेश दिला आहे. रेल्वे दुपदरीकरण करण्यामागेही सरकारचा कोळसा वाहतूक हाच छुपा अजेंडा असल्याचे ते म्हणाले.
महामार्गाचा उपयोग कोळसा वाहतुकीसाठी-ऍड. तिळवे
वेर्णाहून चौपदारी महामार्गाचे विस्तारीकरण कोणाच्या भल्यासाठी होत आहे ? एमपीटीहून वेर्णा-बोरी-अनमोडमार्गे कर्नाटक येथील दोन कंपन्याना कोळसा पुरविण्यासाठी महामार्गाचे विस्तारीकरण होत असल्याचे आरोप ऍड. सुरेल तिळवे यांनी केला. हिरवेगार गोव्याचे निसर्गसौदर्य नष्ट करून काळाकुट्ट कोळसामय गोवा करण्याचा सरकारचा घाट असून त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हावे असे आवाहन तिळवे यांनी केले आहे.
कोळश्याच्या आगमनामुळे बोरी येथील खाजन शेती, नद्या प्रदुषित होणार असून शेती व स्वच्छ पाण्याचा स्रोत सांभाळून ठेवण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून आंदोलन उग्र करणार असल्याचा इशारा चळवळीत सक्रिय असलेले आंदोलनकर्ते डॅविड रॉड्रिगिझ यांनी केला आहे. बोरी, शिरोडा, रासई येथे जेटीचा उपयोग कोळसा वाहतूकीसाठी होणार करणार असल्याचे ते म्हणाले.
या मोहीमेत राज्यभरातील विविध पर्यावरणप्रेमी संघटनांनी सहभाग दर्शविला असून आज रविवार 18 रोजी शिरोडा आणि पंचवाडी, सोमवार 19 रोजी वाडी, तळावली, दुर्भाट आणि बांदोडा. मंगळवार 20 रोजी मडकई व बेतकी-खांडोळा. बुधवार 21 रोजी कुंडई, भोम अडकोण या भागात जनजागृती यात्रा होणार आहेत.