प्रतिनिधी/ पणजी
केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार गोवा सरकारने 2020-21 या वर्षासाठी 100 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. येत्या दि. 5 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट, मुंबई शाखेत या रोख्यांचा लिलाव होणार आहे. हे कर्जरोखे 10 वर्षांच्या कालावधीसाठी आहेत.
इच्छुक बोलीदारांना त्या दिवशी सकाळी 10.30 ते 11.30 या दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (ई-कुबेर) पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे बोली लावता येणार आहे. या लिलावात बिगर स्पर्धा तत्वावर संस्था तसेच व्यक्तिगत बोलीदारांनाही सहभाग घेता येईल. त्यासाठी मुळ रकमेच्या जास्तीत जास्त 10 टक्के मर्यादेत रोखे खरेदी करता येणार आहेत, असे वित्त खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.
दरम्यान, गोवा सरकारने सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवडय़ातच पाच वर्षांच्या कालावधीसाठी 54 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले होते.