क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेचे मान्यताप्राप्त रेफ्री तेजस नागवेकर यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉल रेफ्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. फुटबॉल महासंघाने गोवा फुटबॉल संघटनेचे रेफ्री तेजसला सर्वोत्कृष्ट रेफ्री पुरस्कार दिल्याबद्दल अध्यक्ष चर्चिल आलेमांव यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
तेजसचा आम्हाला अभिमान वाटतो. हा गोव्याच्या फुटबॉलचा गौरव आहे. तेजसने केलेल्या मेहनतीची, परिश्रमांची आणि दृढतेची ही पावती असल्याचे चर्चिल आलेमाव म्हणाले. जीएफएच्या रेफ्री आणि सहाय्यक रेफ्री समितीचे अध्यक्ष ग्रेगरी डिसोझा यांनी तेजसची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने सर्वोत्कृष्ट रेफ्री म्हणून घोषित केल्याबद्दल कौतुक केले आणि हा गोव्यासाठी मोठा सन्मान असल्याचे नमूद केले. तेजस फुटबॉलच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी कौतुकास पात्र आहे, असे ग्रेगरी डिसोझा म्हणाले.
रेफ्री समितीचे उपचेअरमन मॉरिसियाश आल्मेदा आणि रेफ्रींच प्रमुख प्रँकी फर्नांडिस यांनीही तेजसचे अभिनंदन केले आहे. तेजस नागवेकर आता फिफाचे मान्यताप्रप्त रेफ्री आहेत. गोव्याच्या फुटबॉलसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. रेफ्री समितीच्या सर्व सदस्यांनीही तेजस यांना प्रतिष्ठित पुरस्कार दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
फुटबॉलमध्ये उत्कृष्ट पंचगिरी केल्याचा हा पुरस्कार आहे. त्याच्या या पुरस्कारामुळे राज्यातील होतकरू आणि प्रोफेशनल रेफ्रींना निश्चितचपणे समर्पण तसेच उत्कटतेने आणि दृढनिश्चयाने त्यांचे कर्तव्य बजावण्यास प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.