उत्तम दर्जाचा दूध पुरवठा हेच उद्दीष्ट : सुफीयान शेख
प्रतिनिधी / पणजी
गोव्याच्या दूध पुरवठा क्षेत्रात आता ‘गोवा गोल्ड’ या नवीन दूधाचा प्रवेश झाला आहे. निरंकाल फोंडा येथे दूध डेअरी प्रकल्प असलेल्या गोवा गोल्डने आता संपूर्ण गोवाभरात आपले जाळे विणायला सुरूवात केली आहे. अल्पवयीन गोवा गोल्ड ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. तीन पिढय़ांचा दुधाचा व्यावसाय असलेल्या सुफीयान शेख या तरूणाने आता डेअरी व्यावसायात प्रवेश केला आहे. मागील आठ महिन्याच्या कालावधीत शेख यांनी या व्यावसायात आपले पाय मजबूतपणे रोवले आहेत.
स्वतः शेतकरी असलेल्या व प्रति दिन 130 लिटर दुधाचे उत्पादन घेणाऱया सुफीयान शेख यांचे आजोबा शेख अहमद याच व्यावसायात होते. घरीच ते दूध विक्री करायचे. त्यानंतर सुफीयान यांचे वडील शेख अब्बास हे सुद्धा दुधाच्या व्यावसायात होते. सोसायटीत दूध पुरवठा करून त्यानी दूध व्यावसाय चालविला. मात्र सुफीयान शेख यांनी आजोबा व वडील यांचा व्यावसाय आणखी पुढे नेत डेअरी व्यावसायात प्रवेश केला. आज ते यशस्वीपणे हा व्यावसाय हाताळीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्ध, चांगले व दर्जेदार दूध लोकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांची धडपड आहे. या व्यावसायात आपली स्पर्धा कुणाशीही नाही. लोकांना चांगले दूध पुरविणे आणि गोव्यतील दुधाची गरज भरून काढणे हाच आपला उद्देश असल्याचा सुफीयान शेख यांनी सांगितले.
दुधाची शुद्धता राखली जाणे आवश्यक असते. फार्मवरून थेट डेअरीमध्ये दूध पोचायला हवे. त्याला कोणतीही संसर्ग होता कामा नये. फार्मवरून मिल्किंग मशीनद्भरे दूध थेट बल्क मिल्क कुलरमध्ये येते व तिथून थेट प्रकल्पात आणले जाते. त्यामुळे या दुधाशी तसा मानवी संपर्क येत नाही. त्यामुळे दूध स्वच्छ व जाते रहाते. दूध, दही, लस्सी, पनीर ही उत्पादने तयार केली जातात. त्याचबरोबर लवकरच तुपही बाजारात उपलब्ध होणार आहे. हाय फॅट दूध व फुल क्रीम गायीचे दूधही उपलब्ध होणार आहे.
प्रति लीटर ग्राहकाना 3 ते 4 रुपये दूध स्वस्त मिळायला हवे यावर कंपनीचा भर आहे. त्याचबरोबर गुणवत्ता असलेले दूध ग्राहकांना मिळावे यावर भर दिला जात आहे. दूध प्रकल्पामध्ये मास्क, ग्लोव्हज, सेनिटायझर याचा वापर करून स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. आधुनिक पद्धतीची यंत्रणा उपलब्ध असल्याने दर्जेदार दूध पुरविणे शक्य होत आहे. तांत्रिक कर्मचारी वर्ग, अधिकारी व अनुभव याच्या बळावर उत्तम दूध पुरवठय़ावर गोवा गोल्ड भर देत आहे. भाविष्यात मिल्क फॉर्टीफिकेशनवर भर दिला जाणार आहे. लहान मुलांच्या आहारात भाजीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे व्हीटामीन ए व डी याची कमतरता असते. अन्न व औषध प्रशासनानेही याला मान्यता दिली आहे. अन्य कोणत्याही डेअरीशी आपली स्पर्ध नाही. चांगले दूध पुरविणे व गोव्यातील पैसा गोव्यातच रहावा यावर भर देणे हेच उद्दीष्ट असल्याचे सुफीयान यांनी सांगितले.
सुफीयान शेख हे उत्तम शेतकरी आहेत. त्यानी या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याना 2015 साली त्याना कृषी भुषण पुरस्काराने सन्मानित केली आहे. त्याचबरोबर जास्त दुध उत्पादन, तसेच तालुका पातळीवर सर्वाधिक भाजीपाला उत्पादक असे पुरस्कारही सुफीयान याना मिळाले आहेत. वाळपई गणेश मंडळानेही अशा कामगिरीबद्दल त्याना गौरविले आहे. दूध उत्पादनात व पुरविण्यात गोवा स्वयंपूर्ण असावा अशी आपली अपेक्षा आहे. ग्राहकांकडून आज गोवा गोल्ड दुधाला चांगली मागणी आहे. ईदच्या दिवशी लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण ग्राहकांचा आभारी आहे असेही सुफीयान शेख यांनी स्पष्ट केले.