तेजस्विनीचे दमदार अर्धशतक; कप्तान शिखा पांडे, श्रेया परब, निकिता मळीक, पूर्वा भाईडकरची विजयी कामगिरी
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
तेजस्विनी दुर्गदचे धावचित होण्यापूर्वी 74 चेंडूतील 7 चौकारांनी ठोकलेले संयमी अर्धशतक तसेच तिने कप्तान शिखा पांडे हिच्यासमवेत तिसऱया विकेटसाठी केलेल्या 52 धावांच्या उपयुक्त भागीदारीमुळे गोव्याने विदर्भचा 7 विकेट्सनी पराभव करून महिला सीनियर एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेत आपला दमदार विजय साकारला.
कालपासून या स्पर्धेला आंध्रप्रदेशात सुरूवात झाली. विझागच्या कंडूकुरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर कालच्या सामन्यात विदर्भने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि आपल्या डावात 153 धावा जमविल्या. त्याच्या दिशा कासटने 43, कांचन नागवाणीने 22 तर नुपूर कोहाळेने 21 धावा केल्या. गोव्यासाठी निकिता मळीक आणि पूर्वा भाईडकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
गोव्याने प्रत्युत्तरादाखल, 48.1 षटकात 3 बाद 157 धावा करून विजय साकारला. तेजस्विनी केलेल्या दोन भागीदाऱया मोलाच्या ठरल्या. प्रथम पूर्वजा वेर्लेकर (23 धावा, 52 चेंडू, 4*4) बाद झाल्यानंतर तिने श्रेया परब (37 धावा, 102 चेंडू, 3*4) समवेत दुसऱया विकेटसाठी 47 धावा जोडून विजयाचा पाया रचला व नंतर शिखा समवेत तिसऱया विकेटसाठी विजय मिळवून देणारी मोलाची भागीदारी केली. विदर्भसाठी गार्गी वानकर आणि वैष्णवी खांडकरने प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलकः विदर्भ, 46 षटकात सर्वबाद 153 (लतिका इनामदार 8, वैष्णवी खांडकर 7, सूचल मणियार 0, दिशा कासट 43, भारती फुलमाळी 0, अंकीत भोंगाडे 10, नुपूर कोहाळे 21, कांचन नागवाणी 22, गार्गी वानकर 0, रिना पॉल 15, कोमल झांजड 7 धावा. गोलंदाजीः शिखा पांडे 7-2-12-0, निकिता मळीक 5-1-14-2, सोनाली गवंडर 3-0-13-0, रुपाली चव्हाण 7-2-23-1, पूर्वा भाईडकर 8-2-31-2, तेजस्विनी दुर्गद 5-1-15-1, संजुला नाईक 1-0-7-0) पराभूत विरूद्ध गोवा, 48.1 षटकात 3 बाद 157 (पूर्वजा वेर्लेकर 23, श्रेया परब 37, तेजस्विनी दुर्गद धावचित 50, शिखा पांडे नाबाद 33, संजुला नाईक नाबाद 8 धावा. गार्गी वानकर 6.1-0-17-1, वैष्णवी खांडकर 8-1-20-1).