गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची मागणी : असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही
प्रतिनिधी / मडगाव
गोवा राज्याने खरेदी केलेल्या कोविड प्रतिबंधक लसी बाहेरच्या राज्यांतील लोक येऊन टोचून घेत आहेत. हा प्रकारच आक्षेपार्ह असून हे त्वरित थांबण्याची गरज आहे. गोव्यात काहीही केले तर चालते या भ्रमात सरकारने राहू नये. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिला आहे.
या लसी गोवेकरांच्या पैशांतून खरेदी केल्या आहेत. त्यांचा फायदा गोवेकरांनाच मिळण्याची गरज आहे. मात्र हे सरकार गोवेकरांचे हित पाहत नाही ही आता नित्याची बाब झाली आहे. गोवा सरकारने इतर राज्यांतील लोकांना लस घेण्यास मोकळीक ठेवून आपण गोवाविरोधी सावंतवाडी सरकार आहे हे परत एकदा सिद्ध केले आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.
गोवा सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यावर त्यांनी ‘त्यात काय मोठेसे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याला तीव्र आक्षेप घेताना अशा प्रवृत्तीच्या अधिकाऱयाला आरोग्य सचिवपदावरून हटवावे, अशी मागणी सरदेसाई यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. धवन यांना गोव्यात आता लस पर्यटन हे धोरण राबवायचे असल्यास त्यांना पर्यटन सचिव करा असा उपरोधिक सल्ला सरदेसाई यांनी दिला आहे.
जागतिक निविदा गोवेकरांसाठी की बाहेरच्यांसाठी ?
गोव्यातील 18 ते 44 वयोगटातील लोकांना अजूनही सुलभपणे लस मिळत नाही. यामुळे या लसी आणण्यासाठी सरकार जागतिक निविदा जारी करू पाहत आहे. ही जागतिक निविदा गोवेकरांना लस मिळावी म्हणून की, बाहेरच्या राज्यातील लोकांची सोय होण्यासाठी यावर मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी ताबडतोब स्पष्टीकरण द्याव। अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
गोवेकरांना सुलभपणे लस मिळणे हा त्यांचा अधिकार आहे आणि तो कुणी हिरावून घेतल्यास आम्ही गप्प बसणार नाही. काही ठरावीक घटकांना फायदेशीर व्हावे म्हणून अशी गोवाविरोधी धोरणे राबविणाऱया मुख्यमंत्री सावंत यांना कुणी तरी त्या पदावर आणून बसविले आहे हे ते पदोपदी सिद्ध करतात, असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.