दोडामार्ग / वार्ताहर:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, बांदा, सातार्डा, किरणपाणी, आरोंदा या ठिकाणी येऊन थांबणाऱ्या व सिंधुदुर्गात ‘एंट्रीच्या’ प्रतीक्षेत असलेल्या गोव्यातील कंदबा, तसेच खासगी मिनी बससेवा सिंधुदुर्गात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपने आज केली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन चर्चा करत या संदर्भात एक निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
गोवा तसेच महाराष्ट्र सरकारने गेल्याच महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्हीकडील वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे. दुचाकी, तसेच अन्य खासगी चारचाकी वाहने वगैरेंची आवाजाही सुरू झाली आहे. सोशल डिस्टनसिंग तसेच अन्य नियमावलींचे पालन करत गोव्यातून सिंधुदुर्गात आणि सिंधुदुर्गातून गोव्यात नोकरी उद्योग व्यवसाय यानिमित्त अनेकजण ये जा करत आहेत. मात्र शासकीय सेवेतील बसेस शिवाय अन्य खासगी बसेस यांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. महाराष्ट्राच्या गोव्यात जाणाऱ्या एसटी बसेस दोडामार्ग बसस्थानकात येऊन थांबतात तर गोवा सरकारच्या कंदंबा व खासगी मिनी बसेस दोडामार्ग शहराच्या सीमेवर गोवा हद्दीत येऊन थांबतात. गोव्यातून सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणी येऊ इच्छिणाऱ्यांना विनाकारण पायपीट करत लगतच्या भागात प्रवेश करावे लागते. ते पाहता गोव्यातुन सिंधुदुर्गातील ठिकठिकाणी ये जा करणाऱ्या बससेना मार्ग खुले करून एन्ट्री देण्याची मागणी आज जिल्हा भाजपच्यावतीने करण्यात आली. गणेश चतुर्थीचा सण तोंडावर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने गोवा मार्गे येणारे चाकरमानी तसेच खरेदी विक्री साठी ये जा करणाऱ्यांना बससेच्या माध्यमातून सुलभ व्हावे त्याकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. अध्यक्ष संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला व बालविकास सभापती शर्वाणी गावकर, बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, भाजपचे सरचिटणीस प्रभाकर सावंत, जयदेव कदम आदी उपस्थित होते.
दैनिक तरुण भारत ने दिनांक 22 ऑगस्ट रोजी मांडली होती व्यथा दोडामार्ग सहित बांदा, सातार्डा, आरोंदा, किरणपाणी येथील गोवा हद्दीलगत उभ्या असणाऱ्या बसेस तसेच पायपीट करणाऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्याची ही दखल जिल्हाधीकारी दालनात घेण्यात आली.