केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची वेर्णात ग्वाही : झुआरी नदीवरील दुसरा पूल निवडणूक आचारसंहितेपूर्वी खुला
वार्ताहर /झुआरीनगर
विकासात गोवा समृद्ध व्हायला हवा यासाठी भाजपाचे गोव्यातील सरकार चौफेर विकास साधत आहे. रस्ते आणि महामार्ग या आपल्या क्षेत्रातील बहुतेक प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण होतील. मुंबई गोवा महामार्ग येत्या दीड वर्षात पूर्ण होईल. दुसऱया झुआरी पुलाचे कामही जोरात असून गोव्यात निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी या पुलाचा एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. हा पूल गोव्याचे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी वेर्णा येथे आयोजित केलेल्या महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
लोटली ते वेर्णा आयडीसी असा जवळपास चार किलो मीटर अंतराचा हा महामार्ग उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होता. उड्डाण पुलाद्वारे हा महामार्ग वेर्णा पठारावरून लोटली या सखल भागाला जोडण्यात आलेला आहे. लोटली ते वेर्णा आयडीसी मिसिंग लिंक म्हणून परिचित असलेला हा महामार्ग ते वेर्णातील पणजी मडगाव या महामार्गाला जोडण्यात आलेला आहे. या रस्त्यामुळे लोटली व फोंडा तालुक्याकडे जाण्यासाठी करावा लागणार प्रवास कमी होणार आहे. लोटली व फोंडा तालुक्यातील जवळचे गाव तसेच वेर्णा औद्योगिक वसाहत व मुरगाव बंदरातील अवजड वाहतुकीलाही या महामार्गाचा बराच लाभ होणार आहे. या महामार्गामुळे कुठ्ठाळी नाका ते लोटलीपर्यंतच्या जुना अरूंद रस्त्यावर पडणारा वाहतुकीचा भार बराच कमी होणार आहे. या मिसिंग लिंक महामार्गासाठी 184 कोटी खर्च करण्यात आलेले आहे. सोमवारी सकाळी वेर्णा आयडीसी येथे या महामार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, नगरनियोजनमंत्री बाबू कवळेकर, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, आमदार विल्प्रेड डिसा, आमदार एलिना साल्ढाना, आमदार सुभाष शिरोडकर, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली गोव्याचा चौफेर विकास
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात पूर्ण करण्यात आलेल्या व पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेल्या रस्ते व महामार्ग प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की, गोवा विकासात समृद्ध व्हायला हवा यासाठी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार चौफेर विकास साधत आहे. रस्ते व महामार्गाच्या क्षेत्रात येणाऱया काळात अधिक प्रगती दिसणार आहे. अटल सेतू पूर्ण व्हावा ही स्व. मनोहर पर्रीकरांची इच्छा होती. निधीच्या अडचणीमुळे हे काम रखडले होते. मात्र, केंद्र सरकारने गोवा सरकारची अडचण लक्षात घेऊन 400 कोटींचा निधी खर्च करून हा रस्ता तयार करण्यास हातभार लावला. आजही गोव्यात रस्ते व महामार्गाची अनेक कामे होत आहेत. बहुतेक कामे 2022 पर्यंत पूर्ण होतील. मुंबई ते गोवा हा महामार्ग येत्या दीड वर्षांत पूर्ण होईल. झुआरी नदीवरील दुसऱया पुलाचेही काम जोरात असून गोव्यात निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या पुलाचा एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या पुलावरून संपूर्ण गोव्यावर नजर टाकता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार असून हा प्रकल्प गोव्यातील एक पर्यटन स्थळ ठरेल, असे गडकरी म्हणाले. गोव्याचा मोपा विमानतळही लवकरच पूर्ण होणार असून या विमानतळासाठी होणारा लिंक रोड महामार्ग जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकार या महामार्गासाठी 1200 कोटी खर्च करणार आहे. रस्ते व महामार्गाच्या क्षेत्रात गोव्यात भरपूर विकास होत आहे. अशा विकासासाठी जनतेचेही सहकार्य आवश्यक आहे, असे केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले.
सात वर्षांत गोव्यात रस्त्यांच्या विकासासाठी केंद्राकडून 10 हजार 500 कोटींचा निधी : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारने गोव्यात मागच्या सात वर्षांपासून रस्ते, महामार्ग, पूल अशा विकासासाठी दिलेल्या आर्थिक योगदानाची माहिती दिली. ते म्हणाले की, 2014 ते आजपर्यंत केंद्र सरकारच्या केवळ महामार्ग मंत्रालयाकडूनच 10 हजार 500 कोटी रुपये गोव्यातील विविध रस्ते, महामार्ग व पूल बांधकामांसाठी खर्च करण्यात आलेले आहे. गोवा मुक्तीनंतरच्या साठ वर्षांतील हा इतिहास असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्य झालेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मनोरा उभारण्याची पायाभरणी मंत्री गडकरी यांच्याच हस्ते गडकरी केंद्रात मंत्री झाल्यापासूनच त्यांनी गोव्याला काय हवे किंवा काय काय करणे शक्य आहे याची सर्व मुख्यमंत्र्यांच्या काळात चाचपणी करीत राहिले आणि ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदतही करीत राहिले, असे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी गडकरींच्या योगदानामुळे गोव्यात साकारलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. गडकरी यांच्याच मदतीमुळे येणाऱया काळात उपलब्ध होणाऱया सोयीसुविधांची त्यांनी माहिती दिली. झुआरी पुलावरील दुसरा पूल देशातील अशा प्रकारचा तिसरा पूल ठरणार असून त्यावर उभारण्यात येणारा मनोरा हे गोव्याचे खास पर्यटन आकर्षण ठरेल. पुलावर मनोरा उभारण्याची पायाभरणी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याच हस्ते करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. लोटली ते वेर्णापर्यंत रस्ता जोडण्याचे कठीण काम सरकारच्या अभियंत्यांनी खूप कष्टाने पूर्ण केले आहे. उत्तर गोव्याला दक्षिण गोव्याशी जोडण्याचे, मुरगाव बंदर व दाबोळी विमानतळाला महामार्गाशी जोडण्याचे काम या रस्त्याने केलेले आहे. हे लिंक शोधण्याचे काम आपल्या अभियंत्यानी केले. त्यामुळेच त्याला मिसिंग लिंक रोड म्हटले गेल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.