सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीतर्फे सर्वेक्षण
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील बेकारीचा दर मोठय़ा प्रमाणात वाढून 21 टक्क्यापर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वरील माहिती देण्यात आली आहे. त्या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक बेकारीचा दर असणारे गोवा हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे.
सप्टेंबर 2020 मध्ये गोव्याचा बेकारी दर सेंटरच्या सर्वेक्षणाप्रमाणे 15.4 टक्के होता. नोव्हेंबर 2018 मध्ये तोच दर 2.1 टक्के होता, शहरी-ग्रामीण अशा दोन्ही भागातील बेकारीचा दर वाढला असून कोरोना महामारीचा फटका बसल्याने अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्याचे त्यातून समोर आले आहे.
कोरोनाचा फटका बसल्याने अनेकांच्या नोकऱया गेल्या तर अनेक उद्योग धंदे बंद पडले त्याचा परिणाम नोकऱयांवर झाला. कोरोनाच्या भीतीने अनेकजण नोकऱया सोडून गेले तर अनेकांना नोकरीतून काढून टाकले. त्याचा परिणाम म्हणून हा बेकारीचा दर गोव्यात वाढल्याचे दिसून आले आहे. या कोरोना काळात बेकारांना नोकऱया मिळाल्या नाहीत, आणि अनेकांच्या असलेल्या नोकऱया गेल्याने ते बेकार झाले. त्यामुळे बेकारीचा दर वाढला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. दरम्यान माजी कामगारमंत्री आणि पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी गोव्यातील बेकारीचा दर वाढल्याप्रकरणी सरकारवर टीका केली आहे.