प्रतिनिधी /मडगाव
गोव्यातील सर्व पोलीस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असल्याची माहिती गोवा पोलीस खात्याने दिली आहे. निधी अभावी गोव्यातील पोलीस स्थानकात सीसीटीव्ही केमेरे बसविण्यात विलंब होत असल्याचे वृत्त गोव्यातील एका दैनिकात (तरुण भारत नव्हे) प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन राज्य मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला नोटीस जारी केली होती आणि 22 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचा आदेश दिला होता.
या पार्श्वभूमीवर बुधवारी,25 ऑगस्ट 2021 रोजी पोलीस मुख्यालयातील डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (सध्या ताबा असलेले) पंकज कुमार सिंग यांनी गोव्यातील सर्व पोलीस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असल्याची माहिती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात परमवीर सिंग सैनी विरुद्ध बलजीत सिंग व इतर ( एसएलपी (क्रिमीनल) क. 3543/2020 खटल्यात भारतातील सर्व पोलीस स्थानकात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत असा आदेश दिला होता. सर्वोंच्च न्यायालयाच्या या निवाडय़ानुसार गोवा पोलिसांनी सर्व पोलीस स्थानकात यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत अशी माहिती दिली आहे.