वार्ताहर/ थिवी
कोरोना रोगाच्या साथीमुळे लॉकडाऊन झाल्यापासून गोव्यातील बिगरगोमंतकीय कामगार आपापल्या गावी जाण्यास इच्छूक होते, अशा 1196 कामगारांना घेऊन गोव्यातून पहिली कोकण रेल्वेची खास रेल्वे गाडी ‘श्रमिक एक्सप्रेस’ ग्वालियर (मध्य प्रदेश) येथे जाण्यासाठी काल शुक्रवारी दु. 12. 30 वा. थिवी रेल्वे स्टेशनवरून रवाना झाली. या रेल्वेला स्थलांतरित कामगार विभागाचे अधिकारी कुणाल यांनी हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी रेल्वे स्टेशनवर पोलीस महासंचालक परमादित्य, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उप जिल्हाधिकारी दशरथ रेडकर, विविध पोलीस स्थानकांचे पोलीस इन्स्पेक्टर तसेच अन्य पोलीस मिळून सुमारे 500 पोलीस कर्मचारी होते.
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे आपापल्या गावी जाण्यास इच्छूक असलेल्या बिगरगोमंतकीय कामगारांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार ही पहिली गाडी मध्यप्रदेशला रवाना झाली. यावेळी प्रवाशांना आणण्यासाठी दक्षिण गोव्यातून 18 कदंब बसगाडय़ा व उत्तर गोव्यातून 16 कदंब बस गाडय़ांचा वापर करण्यात आला होता.
गावात जाऊन शेती करणार
या कामगारांच्या चेहऱयावर एक प्रकारचे तेज दिसत होते. यातील काही कामगारांबरोबर चर्चा केली असता त्यांनी गोव्यात कामधंदा बंद पडल्यामुळे आपल्याला गावी जाण्यापासून गत्यंतर नाही तसेच गावात शेतीची कामे असल्यामुळे गावात जाऊन शेती व इतर कामे करणार असल्याचे सांगितले.
आज गाडीत बसल्यामुळे खूप आनंद
एका महिला प्रवाशाने सांगितले की, ती आपल्या मुलीच्या प्रसुतीसाठी गोव्यात दोन महिन्यापूर्वी आली होती. तेव्हापासून येथे अडकून पडली होती. आपण पायी चालत गोव्याबाहेर जाण्याचा प्रयत्न केला होता पण पोलिसांनी अडविल्यामुळे येथेच रहावे लागले. आज गाडीत बसल्यामुळे खूप आनंद होतो. यासाठी सरकारचे आभार मानले.
गोव्यात शिकणारी मुलेही गेली गावी
यात काही लहान मुले होती जी गोव्यात शाळेत जात होती. त्या मुलांना विचारले असता त्यांनी आपल्याला गोव्यात शिकावेसे वाटते, पण वडिलांना काम नसल्यामुळे गावी जावे लागत आहे.
या बिगरगोमंतकीय कामगारांमध्ये गवंडी काम करणारे, पॅटरींगचे काम करणारे, टाईल्स फिटींग, इतर मजूर, कारपेंटर तसेच रस्ता बांधकाम करणारे मजूर होते. तसेच त्यांची घरची मंडळीही सोबत होती. काही कामगारांनी जेव्हा लॉकडाऊन उठविणार तेव्हा परत गोव्यात येण्याचे मनसुबेही व्यक्त केले.