चेकपोस्टवर आरोग्य तपासणी
प्रतिनिधी / बांदा:
‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर गोव्यात अडकलेल्या जिल्हय़ातील नागरिकांना परत सिंधुदुर्गात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रितसर प्रशासकीय परवानगी दिल्यानंतर बुधवारी दुपारी सातजणांची पहिली तुकडी बांदा-पत्रादेवी चेकपोस्टवर दाखल झाली.
यावेळी सावंतवाडीचे नायब तहसीलदार प्रदीप पवार, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते. गोव्यातून जिह्याच्या हद्दीत आल्यानंतर प्रथम आरोग्य विभागामार्फत सर्वांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य तपासणीत सर्वजण नॉर्मल असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. त्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गातील नागरिक गोव्यात अडकून पडले आहेत. त्यापैकी 106 नागरिकांना जिह्यात आणण्यास जिल्हाधिकाऱयांनी मंजुरी दिली आहे. गोवा सरकारनेही त्यांना पाठविण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार बुधवारी दुपारी सातजणांची पहिली तुकडी बांदा चेकपोस्टवर दाखल झाली. टप्पाटप्प्याने उर्वरित नागरिकांना आणले जाणार आहे. आरोग्य तपासणीत नॉर्मल असणाऱयांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात येणार आहे. सर्दी, खोकला, घसा खवखवणे यासारखी लक्षणे दिसल्यास संबंधितांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.