प्रतिनिधी /पणजी
गोव्यात रविवारी सकाळी अचानक सर्वत्र मध्यम तथा हलक्य प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने अनेकांची धांदल करून टाकली. पेडणे, डिचोली, सांखळी, म्हापसा, पर्वरी, पणजी, जुने गोवे, फोंडा आदी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात सुमारे अर्धातास पाऊस कोसळला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगंतूक पडलेला हा पाऊस हवामानात झालेल्या बदलामुळे आहे.
नंतर दुपारी सर्वत्र जोरदार वारे वाहू लागले. जोरदार वारे म्हणजेच जोरदार पावसाची वाटचाल असेच असते. हवामान खात्याने मात्र मंगळूरपासून कारवारपर्यंत पावसाचा एक पट्टा असून तिथे काही भागात पाऊस पडेल असा अंदाज आहे. वाऱयाचा वेग वाढला तरी फारसा परिणाम गोव्यावर होणार नाही, असे म्हटले आहे.
आगामी 4 दिवसात दक्षिण भारतात विशेषतः अरबी समुद्रात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून हा पाऊस वरच्या बाजूने सरकला तर गोव्यात देखील पुढील आठवडय़ात पाऊस पडू शकतो.
रविवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे आंबा, काजूच्या झाडांना आलेल्या मोहरावर विपरित परिणाम होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली.