प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यातील जनता भाजप व काँग्रेसला कंटाळली आहे. जनता आत्ता पर्याय शोधत असून हा पर्याय म्हणून ‘आम आदमी पार्टी’कडे पाहिले जात आहे. अनेक युवक आज आपमध्ये प्रवेश करीत असून आगामी सरकार हे आपचे असेल असा दावा आपचे गोवा निमंत्रक राहूल म्हाबरे यांनी केला आहे.
काल बाणावली मतदारसंघातील सुमारे 53 युवा कार्यकर्त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी श्री. म्हाबरे बोलत होते. बाणावली मतदारसंघात आपची पहिली जाहीर सभा झाली होती. तेव्हा पासून बाणावली मतदारसंघातून आपला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याच मतदारसंघातून नव्या क्रांतीला सुरवात होईल असा विश्वास श्री. म्हाबरे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होतील. या निवडणुकीत आपला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. जिल्हा पंचायतीनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू होईल. तो पर्यंत पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आणखीन कार्यकर्ते पक्षात आणावे व पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन यावेळी केले.
कुणालाही घाबरण्याचे कारण नाही
बाणावलीतील जनता आत्ता कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. आजवर जेव्हढा दबाव सहन केला तेव्हढा खुप झाला. आपण ‘आम आदमी पक्षा’त प्रवेश केला तर आपला व्यवसाय बंद केला जाईल अशी भीती येथील युवकांना आहे. मात्र, आत्ता येथील युवकांनी या भीतीला भिक घालायची नाही हे नक्की केले असून त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून 53 युवकांनी आपमध्ये प्रवेश केला असल्याचे उद्गार कॅप्टन वियेगस यांनी काढले.
या वेळी ऍर्नेस्टो तसेच जॉर्सन व पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थितीत होते.