प्रतिनिधी/ पणजी
चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसबाबत गोवा सरकारही सतर्क झाले असून काल जलद कृती दल समितीची बैठक घेण्यात आली. कशा पद्धतीने कोरोना व्हायरस प्रकरणे हाताळावी याबाबत चर्चा करण्यात आली. दाबोळी विमानतळावर थर्मल स्कॅनर बसविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, चीनमधून गोव्यात दाखल झालेल्या एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय असल्याने या व्यक्तीला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसची प्रकरणे हाताळण्यासाठी गोमेकॉत वेगळा वार्ड व अतिदक्षता विभाग तयार ठेवण्यात आला आहे.
संशयित रुग्ण गोमेकॉत दाखल
गळ्याला आतून सूज आल्याने त्या व्यक्तीला गोमेकॉत दाखल केले आहे. तुर्त या रुग्णाला देखरेखीखाली ठेवण्यात आले असून चाचणी करुन नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठविण्यात आले आहे. अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. आरोग्य सेवा संचालनालयाच्या जलद कृती दलाने याबाबत स्पष्ट केले आहे.
तूर्त भारतात एकही रुग्ण नाही
कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे एकही प्रकरण तूर्त तरी भारतात नोंद झालेले नाही मात्र अशा प्रकारची प्रकरणे हाताळण्यासाठी गोवा सरकार आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. 30 खाटांची क्षमता असलेला एक वॉर्ड सज्ज ठेवण्यात आला आहे.
संशयित रुग्ण आपल्या बायकोसह चीनमधील कुंशन भागात होता. कोरोना व्हायरसने थैमान घातलेल्या वुहान शहरापासून हा भाग 750 कि.मी. च्या अंतरावर आहे. सात दिवसाअगोदर सदरचा रुग्ण गोव्यात आला. दिल्लीत भेट देऊन तो गोव्यात आला होता. मात्र गळा दुखत असल्याने त्याला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.