आरोग्य खात्यातर्फे जाहीर : लोकांनी न घाबरता विशेष काळजी घेण्याचे आवाहन.हॉस्पिटल्ससह सर्व सज्जता
प्रतिनिधी /पणजी
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकांनी राजकीय पक्षांच्या सभा, कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. गोवा राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे आरोग्य खात्याने जाहीर केले असून लोकांनी काळजी घेऊन सावधानता बाळगावी, असे आवाहन आरोग्य खात्याने कले आहे. गोवा राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे आरोग्य खात्याने जाहीर केली असून लोकांनी काळजी घेऊन सावधानता बाळगावी, असे सूचित केले आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत खात्याच्या संचालिका डॉ. आयरा आल्मेदा व डॉ. राजेंद्र बोरकर यांनी वरील माहिती देऊन सांगितले की, कोरोनाच्या तिसऱया लाटेसाठी आरोग्य खात्याने सज्जता केली असून बांबोळी येथील सुपर स्पेशालिटी ब्लॉक तसेच म्हापसा, मडगावची दोन्ही जिल्हा इस्पितळे कोरोना उपचारासाठी तयार करण्यात आली आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांना उपचार करून घरी आयसोलेशन देण्यात येणार असून मोठी लक्षणे असणाऱयांना हॉस्पिटलात दाखल करून घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
गर्दी टाळावा, मास्क वापरावा
कोरोनाचे संकट संपूर्ण देशात आणि विविध राज्यात पुन्हा एकदा वाढले असून गोवा राज्यासह इतर ठिकाणी देखील रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. लोकांनी कोरोनाचे नियम पाळून काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व गर्दी टाळावी, मास्क सॅनिटायझर सामाजिक अंतराचे पालन करून स्वतःला सुरक्षित ठेवावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
पंधरा हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण
डॉ. बोरकर म्हणाले की, गोव्यातील 95 टक्के जनतेचे लसीकरण झाले असून त्यांना कोरोनाचा धोका फारसा संभवत नाही. त्याशिवात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असून सोमवार-मंगळवारी मिळून एकूण 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुमारे 74000 विद्यार्थ्यांना चालू आठवडय़ात लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यातील 20 टक्के लक्ष्य साध्य झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.