प्रतिनिधी/ पणजी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोमाता प्रकरणी भाजपला टार्गेट करताना गोव्यात गोमांसाची मोठय़ा प्रमाणात होत असलेली विक्री व सेवन करणारी मंडळी या अनुषंगाने केलेली टिप्पणी सध्या बरीच चर्चेत आलेली आहे.
भाजपने महाराष्ट्रात गायीला गोमाता समजून गोहत्येवर बंदी घालण्याची जोरदार मागणी अलिकडे मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या अनुषंगाने आक्रमक बनलेल्या शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना टार्गेट केले.
‘महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता’
उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात ‘महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता’ असे म्हटले आहे. भाजपचे दुटप्पी धोरण आहे आणि महाराष्ट्रात गोहत्येवर बंदीची मागणी करणारा भाजप गोव्यात मात्र भाजपचे सरकार आहे आणि इथे गोमांस भक्षण चालू आहे हे कसे ! अगोदर गोव्यातही बंद करा व नंतर तुमचे हिंदुत्व जाहीर करा, अशी मागणी आपल्या घणाघाती भाषणातून ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर आता गोव्यात सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. गोव्यातील गोप्रेमी आता नव्याने काही पावले उचलून सरकारकडे गोमांसावर बंदीची मागणी करण्याची शक्यता आहे.