वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
प्रतिनिधी/ मडगाव
ऊर्जा ही आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर तिची मागणीही वाढत आहे. काळाबरोबर संपत असणारे पारंपरिक ऊर्जा स्रोत व त्यांचे भडकलेले भाव, वीज पुरवठ्यातील कपात व वाढते प्रदूषण यांमुळे अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर अनिवार्य ठरत आहे. त्या दृष्टीने गोवा हरित उर्जेसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
आकें पावर हाऊस सर्कल ते मडगाव फायर स्टेशन पर्यंतच्या रिंग रोडचे 3.28 कोटी रूपये खर्च करून सौंदर्यीकरण केले जात आहे. या रिग रोडच्या पथदीपाचे काम पूर्ण झाले असून हे पथदीपाची रोषणाईचे उद्घाटन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना वीजमंत्र्यांनी हरित उर्जेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
बिर्ला येथे झुवारी कंपनी तसेच आमोणा येथे वेदांता कंपनी असे दोन पायलट प्रोजेक्ट करण्याचा प्रस्ताव आहेत. याठिकाणीच हरित उर्जानिर्मिती करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती वीजमंत्री श्री. ढवळीकर यांनी दिली. सौर उर्जेची योजना विधानसभा अधिवेशनापूर्वी येईल. त्यावर आपण आत्ता भाष्य करीत नसल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. पथदीपाच्या उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावर मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, वीज खात्याचे अधीक्षक अभियंते राजीव सामंत, जीएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ज्युड कार्व्हालो उपस्थित होते.
पथदीप योजनेमुळे अनेक समस्या मार्गी
या प्रसंगी पुढे बोलताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, गोवा सरकारची पथदीप योजना एप्रिल 2022 मध्ये तयार करण्यात आली होती. ती राबविण्याची जबाबदारी आपल्याजवळ आली. सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खाते, जीएसआयडीसी किंवा पर्यटन खाते असो किंवा नगरपालिका, ग्रामपंचायती तसेच महामंडळे ही खाजगी आस्थापने असो. यांच्या वेगवेगळ्या योजना असायचा, त्या राबविताना दबाव असायचा. पथदीपाची देखभाल व बिल कुणी भरावे ही समस्या निर्माण व्हायची. मात्र, पथदीप योजनेमुळे ती वीज खात्याअंतर्गत आली आहे. ग्राहकांकडून अतिरिक्त पाच पैसे तसेच कंपन्या व अन्या बड्या आस्थापनांकडून आठ पैसे आकारून ही योजना पुढे नेली जात असल्याचे वीजमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पथदीप देखभालीठी सव्वादोनशे कोटी रूपये खर्च
पथदीपाची देखभाल करण्यासाठी सुमारे दोनशे ते सव्वादोनशे कोटी रूपये खर्च येत असतो. पण, उत्पन्नाचा स्त्रोत 40 कोटी सुद्धा नसल्याची माहिती वीजमंत्र्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्यात जेसे आपण जबाबदारीने काम केले तसेच वीज खात्यात आपण काम करणार असल्याचे ही मंत्री ढवळीकर म्हणाले. 800 कोटींच्या निविदा भूमीगत वीज वाहिन्या तसेच पालिका व पंचायती यांना समस्या होत्या त्या दूर करण्यासाठी जारी केल्याचे त्यांनी सांगितले. याकामी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पूर्ण सहकार्य लाभले तसेच केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंग 728 कोटी रूपये मंजूर केल्याच्ााr माहिती त्यांनी दिली.
रिग रोडसाठी मुख्यमंत्र्यांचे पूर्ण सहकार्य : कामत आकें पावर हाऊस सर्कल ते मडगाव फायर स्टेशन पर्यंतचा रिग रोड करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याचे आमदार दिगंबर कामत म्हणाले. जीएसआयडी मार्फत सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यात रावणफोंड जंक्शन ते खारेबांद पूल तसेच दैवज्ञ भवन पर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. त्याच बरोबर रावणफोंड जंक्शन ते व्हिक्टर हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. मडगाव शहर चांगले व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहेत.