दाबोळी दौऱयात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला विश्वास
प्रतिनिधी /वास्को
गोवा प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी दाबोळी मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱयात कार्यकर्त्यांनी त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. ठिकठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱयांसोबत बैठका व चर्चाव्दारे संवाद साधून त्यांनी दाबोळी भाजपाचा हुरूप वाढवला. दुपारी दाबोळीतील भाजपाच्या कार्यांलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदानंद शेट तानावडे यांनी दाबोळीसह गोव्यात भाजपाचा पुन्हा एकदा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.
तानावडे यांच्यासोबत दाबोळीचे आमदार व वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, मुरगावचे नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, दाबोळीचे प्रभारी जयंत जाधव, गटअध्यक्ष संदीप सूद, स्थानिक सरपंच, पंच व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा हा गोव्यातील मतदारसंघातील सातवा दौरा होता. आपण आतापर्यंतच्या केलेल्या दौऱयात भाजपाला जनतेकडून योग्य प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आलेले असून गोव्यात पुन्हा एकदा भाजपा सत्तास्थानी येईल याची खात्री आपल्याला वाटत असल्याचे तानावडे म्हणाले. विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने आतापर्यंत विजनवासात गेलेले अनेक ईच्छुक उमेदवार आता पुन्हा दिसू लागलेले आहेत. दाबोळीत जुझे फिलीप डिसोजा त्यात एक आहेत. नुकतेच त्यांनी एक चुकीचे विधान करून जनतेचा रोष पत्करला आहे. निवडणुकीतही त्यांना याची किंमत मोजावी लागेल असे तानावडे म्हणाले. दाबोळी मतदारसंघात मंत्री माविन गुदिन्हो यांनी चांगले कार्य केलेले असून जनतेला त्यांच्या कार्याची जाणीव आहे. त्यामुळे माविन गुदिन्हो दाबोळीतून पुन्हा विजयी होतील असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला.
मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना विरोध पुन्हा गैरप्रचाराला लागल्याचे म्हणाले. मागच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आणि पालिका निवडणुकांमध्येही विरोधकांनी भाजपाबाबत गैरप्रचार चालवला होता. परंतु ते पूर्ण फसले गेले होते. आताही विरोधकांनी तोच कित्ता गिरवणे सुरू केलेला असून पण त्यांना यश येणार नाही. गोव्याची जनता जागृत असून भाजापाच बहुमत प्राप्त करेल अशं मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.