मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास रुबीगुला बोधचिन्हाचे थाटात अनावरण
क्रीडा प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात होणाऱया 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन आम्ही पूर्ण साधनसुविधांसह यशस्वीरित्या पार पाडणार आहोत. या स्पर्धेसाठी लागणारे स्टेडियम्स, साधनसुविधा पूर्णपणे तयार आहेत. सहभागी होणाऱया 12 हजार पेक्षा अधिक खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांची राहण्याची, जेवणाची सोय उत्तम दर्जाची असेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही स्पर्धा सर्वांत यादगार, संस्मरणीय होणार यात शंका नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी पाटो येथील मल्टिर्पपज पार्किंग इमारतीत काल शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री किरण रिजिजू, केंद्रीय आयुषमंत्री तथा गोवा ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्रीपादभाऊ नाईक, राज्याचे क्रीडामंत्री मनोहर आजगांवकर उपस्थित होते. राज्यात दि. 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
36 वी राष्ट्रीय स्पर्धा यशस्वी करणार
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हे स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गोव्याला ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गोव्यातील प्रत्येक संघटना या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी काम करत आहे. त्यामुळे ही स्पर्धा निश्चितच सर्वांसाठी प्रेरणा ठरेल. गोव्यात सर्व खेळांबाबत साधनसुविधा उपलब्ध आहेत. फक्त शुटींग आणि सायकलिंग खेळाच्या आयोजनासाठी उपयुक्त जागा आमच्याकडे नाही तरी देखील केंद्रातून अधिक सहाय्य मिळाल्यास शुटिंग खेळ आम्ही गोव्यातच घेऊ यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खेळ व खेळाडू ही आमची प्राथमिकता : रिजिजू
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही भारतीय ऑलिंम्पिक संघटनेखाली आयोजित केली जाते. प्रत्येक दोन वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन होत असते, परंतु यावर्षी 10 वर्षाचा कालावधी लागला आहे, यासाठी वाईट वाटते. परंतु गोव्याची तयारी पाहता ही स्पर्धा निश्चितच भव्य होणार आहे. कुठलीही स्पर्धा यशस्वी व्हायची असेल तर स्थानिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तसेच खेळ, खेळाडूंचा सन्मान असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींना आमची प्राथमिकता आहे, असे ते म्हणाले.
गोव्याने आपला खेळ संस्कृतीचा चांगला परिचय करुन दिला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोव्यातील माजी भारतीय खेळाडूंना सन्मानीत करुन गोव्याने आपल्या खेळ संस्कृतीचा परिचय दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया, खेलो इंडिया ही मोहीम सुरु केली आहे ती मोहीम सर्वांनी एकत्रित येऊन पूर्ण केली पाहिजे, असे मत रिजिजू यांनी मांडले.
गोवा राज्य साधनसुविधांसाठी ओळखले जातेः श्रीपादभाऊ
गोवा हे राज्य आपल्या साधनसुविधांसाठी ओळखले जाते. त्यामुळे या स्पर्धेच्या साधनसुविधांविषयी कुणीच शंका घेऊ नये. आम्ही या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज आहोत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी केंद्र सरकारने व क्रीडामंत्री रिजिजू यांनी आम्हाला पूर्ण सहयोग दिला आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्व यंत्रणा या स्पर्धेसाठी सज्ज आहेत, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी 750 कोटी खर्च : आजगांवकर
या स्पर्धेत 36 खेळांचा समावेश असून राज्यातील एकूण 24 ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. सुमारे 750 कोटी खर्च स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. हल्लीच 5 नविन इनडोअर स्टेडियमचे अनावरण केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्याहस्ते करण्यात आले आहे. गोवा जसे पर्यटनसाठी ओळखले जाते तसेच ते क्रीडा क्षेत्रासाठी ओळखले जावे यासाठी आम्ही काम करत आहोत, असे राज्याचे क्रीडामंत्री मनोहर आजगांवकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू सुशीलकुमार आणि ऍथलेटिक्समधील भारताचे पहिले विश्वविजेते अंजू बॉबी जॉर्ज यांची खास पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांच्यासोबत हरियाणाचे क्रीडामंत्री संदिप सिंग, अरुणाचल प्रदेशचे क्रीडामंत्री मामा नातुंग, त्रिपुराचे क्रीडामंत्री मनोज कांती देव, आयओएचे अध्यक्ष नरिंदर ध्रुव बत्रा, सरचिटणीस राजीव मेहता, गोव्याचे मुख्य सचिव परीमल राय, क्रीडा सचिव जे. अशोक कुमार, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे व्ही. एम. प्रभुदेसाई, गोवा ऑलिंम्पिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रुबीगुला ठरला मुख्य आकर्षण
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण स्पर्धेचे बोधचिन्ह होते. सर्वजण आतुरतेने त्याची वाट पाहत होते. गोव्याचा राज्य पक्षी बुलबुल 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा बोधचिन्ह ठरला आहे. बुलबुलच्या नावाचे आकर्षक रुपांतर ‘रुबीगुला’ असे करण्यात आले आहे. यावेळी गोव्याची पारंपरिक लोकनृत्ये व लोकसंगीताच्या सादरीकरणाने उत्साह भरला. सर्व मान्यवरांच्या उपस्थित या ‘रुबीगुला’चे अनावरण करण्यात आले. याच अनावरणासोबत राज्यातील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे बिगुलही वाजले आहे.
तीन गोमंतकीय सुपुत्रांचा सन्मान
जागतिक फुटबॉलमध्ये भारताचे नेतृत्व करणारे गोमंतकीय सुपुत्र फुटबॉलपटू ब्रम्हानंद शंखळवाळकर, ब्रुनो कुतिन्हो व फोर्च्युनाटो प्रँको यांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल यावेळी सन्मानित करण्यात आले.