नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा व्यावसायिक मुष्टियोद्धा विजेंदर सिंगची गोव्यातील कॅसिनोवरील लढत रशियाच्या ऍर्तिश लॉप्सनविरुद्ध होणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले गेले. कोव्हिड-19 मुळे जवळपास वर्षभराचा सक्तीचा ब्रेक घ्यावा लागल्यानंतर या लढतीच्या माध्यमातून विजेंदरचे पुनरागमन होईल. विजेंदर-लॉप्सन 19 मार्च रोजी पणजीतील मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो शिपवर आमनेसामने भिडतील. या लढतीसाठी विजेंदर हा माजी राष्ट्रकुल कांस्यजेता मुष्टियोद्धा जय भगवानच्या मदतीने सराव करत आहे. या लढतीची प्रेक्षकक्षमतेच्या 50 टक्के तिकिटांची विक्री केली जाणार असून 150 हाय-एण्ड तिकिटे उपलब्ध असणार आहेत.
‘वर्षभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागल्यानंतर नव्याने तयारी करणे सहजसोपे अजिबात नव्हते. मात्र, मागील दोन महिने सरावाच्या दृष्टीने माझ्यासाठी उत्तम राहिले. गुरगावमध्ये जय भगवानची मला साथ आहे. शिवाय, मँचेस्टरस्थित माझ्या ब्रिटीश ट्रेनरनी मला ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात सातत्य ठेवले आहे’, असे विजेंदर सिंग या लढतीच्या पार्श्वभूमीवर म्हणाला.
26 वर्षीय लॉप्सनने आजवर 6 प्रो बाऊट लढल्या असून त्यात 4 विजय नोंदवले आहेत. यापैकी 2 नॉकआऊट विजय आहेत. त्याने डिसेंबर 2020 मध्ये खेळलेल्या शेवटच्या लढतीत आपलाच राष्ट्रीय सहकारी युसूप मॅगोमेडबेकोव्हविरुद्ध विजय मिळवला होता. तेथे टेक्निकल नॉकआऊटवर तो विजयी ठरला होता.
दुसरीकडे, विजेंदर आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत आजवर अपराजित राहिला असून 12-0 असे क्लीन रेकॉर्ड त्याने नोंदवले आहे. यात 8 नॉकआऊट विजयांचा समावेश आहे. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱया विजेंदरने यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये घानाचा माजी राष्ट्रकुल चॅम्पियन चार्ल्स ऍडम्यूला नमवले, तो त्याच्या कारकिर्दीतील सलग 12 वा विजय ठरला.
विजेंदरच्या या लढतीसाठी ब्रिटीश ट्रेनर लीला कोव्हिड बंधनामुळे भारतात येता आलेले नाही. विजेंदरने व्यावसायिक मुष्टियुद्धात पदार्पण केले, तेव्हापासून लीचे विजेंदरला मार्गदर्शन रहात आले आहे. जय भगवान देखील हरियाणात पोलीस खात्यात कार्यरत आहे. मात्र, या लढतीसाठी विजेंदरच्या तयारीत मदत करावी, म्हणून रजा घेत तो विजेंदरसमवेत आहे. कॅसिनो शिपवर 19 मार्च रोजी 6 अंडरकार्ड फाईट होणार असून त्यात भारतीय मुष्टियोद्धा नीरज गोयत सुपर वेल्टरवेट गटात संदीप कुमारविरुद्ध लढणार आहे.
कोटस
विजेंदर उत्तम मुष्टियोद्धा आहे. मात्र, मी त्याची अपराजित मालिका खंडित करण्याच्या उद्देशाने येथे आलो आहे. विजेंदरला त्याच्या घरच्या प्रेक्षकांसमोर नमवण्याची संधी माझ्याकडे चालून आली आहे आणि त्या दृष्टीने माझा सराव सुरु आहे.
-विजेंदरचा रशियन प्रतिस्पर्धी लॉप्सन