शंकर महादेवन यांचे मत, माध्यमांशी साधला संवाद
प्रतिनिधी/ पणजी
गोवा हे ठिकाण संगीतासाठी योग्य ठिकाण आहे. गोव्यातही दिग्गज कलाकार, गायक आहेत ज्यांनी देशपातळीवर मोठे नाव कमावले आहे. लता मंगेशकर, अजित कडकडे, वर्षा उसगावकर आदींनी गोव्याचे नाव मोठे केले आहे. तरीही गोव्यात संगीत शिकण्यासाठी योग्य सुविधा निर्माण होण्याची गरज आहे. सुविधा निर्माण झाल्यास गोव्यातही उत्तमातील उत्त गायक, संगीतकार घडतील, असा आशावाद आहे, असे मत प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांनी व्यक्त केले.
पर्पल फेस्टच्या निमित्ताने गोव्यात दिव्यांग मुलांसाठी प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महादेवन यांनी सांगितले की, गोव्यात संगीत अकादमी सुरू करण्यात आली आहे, त्याचा मला आनंद आहे. संगीताताली आनंद हा प्रत्येकाला मिळायला हवा, असे माझे प्रामाणिक मत आहे. गोवा हे सांस्कृतिक राज्य असल्याने या ठिकाणी मी येण्यास नेहमी तयार असतो. त्याप्रमाणेच देशातील आणि विदेशातील विद्यार्थी येथे संगीत शिकावेत, यासाठी संगीत शिकण्यासाठी योग्य सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे.
भारतीय संगीत हे जगात आदर्शवादी आहे. कारण या ठिकाणी दोन प्रकारचे संगीत पहायला मिळते. बाहेरील देशात केवळ एका प्रकारचे संगीत आहे. परंतु भारतात तसे नाही. भारतात अनेक प्रकारचे संगीत असून, हे भारताचे वैशिष्टय़ आहे. शंकर महादेवन अकादमीत सुमारे 88 देशातील विद्यार्थी संगीत शिकत आहे. हे माझे नव्हे, तर भारताचे कौतुक म्हणावे लागेल, असेही शंकर महादेवन यांनी सांगितले.
अभ्यासक्रमात संगीताचा विषय यावा
संगेत माणसात ऊर्जा निर्माण करते. संगीतामुळे अनेक देश एकमेकांशी जोडले आहे. भारतीय संगीताला अजरामर इतिहास आहे. त्यामुळे संगीत विषय हा प्रत्येक विद्यालयात शिकविण्यात यायला हवा. संगीताशी प्रत्येक नागरिक एकरूप होतो. मुलेही लवकर संगीताशी जोडली जातात. त्यामुळे इतिहास आणि भूगोल या विषयाव्यतिरिक्त संगीत विषयही अभ्यासक्रमात यावा, अशी माझी इच्छा आहे, असे शंकर महादेवन यांनी सांगितले.