पणजी \ ऑनलाईन टीम
गोव्यामध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्यामुळे गोवा सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाऊन लागू असेल. पाच दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन लागू करण्यात आला असला, तरी लोकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन गोवा सरकारकडून करण्यात आलं आहे.
यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील लॉकडाऊन दरम्यान बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गोव्याच्या सीमारेषा अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू ठेवल्या जातील, असं देखील गोवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
लोकांनी घाबरण्याचं कारण नाही. सर्व किराणा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. माझं स्थलांतरीत मजूरांना देखील आवाहन आहे की त्यांनी राज्य सोडून जाऊ नये, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.