वृत्तसंस्था/ सुरत
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे झालेल्या इलाईट अ गटातील सामन्यात यजमान गुजरातने गोवा संघाचा 8 गडय़ांनी पराभव करून आपला दुसरा विजय नेंदविला. यापूर्वी गुजरातने या स्पर्धेत पहिला विजय नोंदविताना छत्तीसगडचा 3 गडय़ांनी पराभव केला होता.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोवा संघाचा डाव 45.4 षटकांत 159 धावांत आटोपला. त्यानंतर गुजरातने 27.4 षटकांत 2 बाद 162 धावा जमवित सदर स्पर्धेत आपला दुसरा विजय नोंदविला.
गोवा संघाच्या डावामध्ये दर्शन मिसाळने 44 तर के.डी. एकनाथने 36 धावांचे योगदान दिले. सलामीचा आदित्य कौशिक 14 धावांवर बाद झाला. इशान गडेकरने 18 धावा जमविल्या तर स्नेहल कौठणकरने 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. दर्शन मिसाळने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत 4 चौकारांसह 44 धावा जमविल्याने गोवा संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. गुजराततर्फे हार्दिक पटेलने 34 धावांत 3 तर नागवासवालाने 31 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात संघाची सलामीची जोडी रावल आणि प्रियंक पांचाळ यांनी सलामीच्या गडय़ासाठी 53 धावांची भागिदारी केली. रावलने 26 चेंडूत 37 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर पांचाळ आणि भार्गव मेराई यांनी दुसऱया गडय़ासाठी 92 धावांची भागिदारी केली. पांचाळने नाबाद 57 तर मेराईने 55 चेंडूत 57 धावा जमविल्या. गोवा संघातर्फे गांवकर आणि पांडरेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः गोवा 45.4 षटकांत सर्व बाद 159 (दर्शन मिसाळ 44, के.डी एकनाथ 35, कौठणकर 23,हार्दिक पटेल 3-24, नागवासवाला 2-31), गुजराथ 27.4 षटकांत 2 बाद 162 (पांचाळ नाबाद 57, भार्गव मेराई 37, रावल 37, गांवकर आणि पांडरेकर प्रत्येकी एक बळी).