मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱयांना सूचना
बेंगळूर : गोहत्या बंदी कायदा अध्यादेशाद्वारे जारी करण्यात आला असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा पुरवठा, कोविड लसीकरण मोहीम यशस्वी करावी आणि बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घ्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी जिल्हाधिकाऱयांना दिल्या. विधानसौध येथे बुधवारी राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओ आणि प्रादेशिक आयुक्तांची बैठक पार पडली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीमुळे प्रलंबित असलेल्या योजना त्वरित पूर्ण करा, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱयांनी आणखी कार्यतत्पर रहावे, विलंब नीती अवलंबिल्याचे दिसून आल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱयांना दिला. विधानसभेत बहुमताने संमत झालेले पशूहत्या प्रतिबंध आणि संरक्षण कायदा-2020 जारी करावा. यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या मार्गसूचींचे आपापल्या जिल्हय़ांमध्ये काटेकोरपणे पालन होईल, यावर लक्ष केंद्रीत करा. त्याकरिता आवश्यक पावले तातडीने उचलावीत. कोरोना नियंत्रणाची लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वच स्तरातील अधिकाऱयांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही येडियुराप्पांनी दिल्या.