देवस्की जमीन वादासंदर्भात तहसीलदारांनी घेतली शांतता बैठक
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
‘गावकऱयांनो, शांतता व संयम राखा. सर्व्हे नं. 78 व 88 देवस्की जमिनीसंदर्भातील त्यांचीही कागदपत्रे पाहिली आहेत व तुमचीही कागदपत्रे पाहिली आहेत. दंगाधोपा करू नका, शांततेने गावची जमीन मिळवून घ्या. मी तुमच्याबरोबर आहे’, असे शांततेचे आवाहन तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनी गौंडवाड ग्रामस्थांना केले.
गौंडवाड येथील सर्व्हे नं. 78 व 88 या देवस्की जमिनीचा वाद परत उफाळून आल्यामुळे बुधवारी पावसामध्येच भैरवनाथ मंदिरासमोर शांतता बैठक घेण्यात आली. यावेळी ते ग्रामस्थांना व इतरांना उद्देशून बोलत होते.
यावेळी एसीपी गणपती गुडाजी, काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, काकती विभागाचे सर्कल एस. बी. बिसगट्टी, कडोली विभाग तलाठी ए. एम. मुल्ला आदी अधिकारीही उपस्थित
होते.
गौंडवाड गावातील सर्व्हे नं. 78 व 88 ही देवस्की जमीन अशोक केदारी पाटील व भरत केदारी पाटील यांना कसण्यासाठी ग्रामस्थांच्यावतीने त्याकाळी दिलेली आहे. परंतु, ती जमीन त्यांनी आपल्या नावावर करून घेतली आहे. ही जमीन परत गावाला मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ एकवटले. गेल्या आठ दिवसांपूर्वी सदर जमिनीच्या मुद्दय़ावरूनच शेतामध्येच ग्रामस्थ पेरणी करत असतेवेळी अशोक पाटील कुटुंबीयांकडून ग्रामस्थ अनिल पाटील व शंकर निलजकर यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करून पळून गेल्यावर समस्त ग्रामस्थांनी अशोक पाटील, भरत पाटील, एम. एन. पाटील यांच्या घरावर हल्ले केले. यानंतर ग्रामस्थ व त्यांनी दोघांनीही काकती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.
सदर जमिनीसंदर्भात 30 नोव्हेंबर 2020 रोजीसुद्धा ग्रामस्थ सतीश पाटील यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी लागलीच आमदार सतीश जारकीहोळी यांनी गावाला धावती भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करून जमीन गावकऱयांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
मारामारीने प्रश्न मिटत नाहीत – एसीपी गणपती गुडाजी
देवस्थान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करतेवेळी एसीपी गणपती गुडाजी म्हणाले, ‘दंगाधोपा, मारामाऱया करू नका. शांतीने, सामंजस्याने व कायद्याच्या चौकटीत राहून तुमचे कार्य चालू ठेवा. तसेच त्यांनीसुद्धा शांततेनेच राहून आपणाला न्याय मिळवून घ्यावा. मारामारीने प्रश्न मिटत नाहीत व शांतीने व सामंजस्याने कोणताही तोडगा निघू शकतो,’ अशा शब्दात त्यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.
गावाला जमीन मिळवून देण्यासाठी लढा असाच सुरू ठेवणार -नंदू पाटील (निवृत्त जवान)
सर्व्हे नं. 78 व 88 ही गावची देवस्थानची जमीन आहे. अशोक केदारी पाटील व भरत केदारी पाटील यांना त्यावेळच्या जाणकार नागरिकांनी कसून खायला दिली होती. परंतु, त्यांनी जमीन आपल्या नावावर करून घेतली आहे. ही गावची जमीन गावाला मिळवून देण्यासाठी आम्ही ग्रामस्थ हा लढा असाच सुरू ठेवणार आहोत.
जमीन आम्ही मिळवून घेणारच – सोनम पाटील
सदर जमीन अशोक पाटील व भरत पाटील यांना कसून खाण्यासाठी ग्रामस्थांनी दिली होती. परंतु, आपली नावे चढवून आपण मालक आहोत, असे सांगत आहेत. परंतु, ही समस्त गावची जमीन आहे. ती आम्ही मिळवून घेणारच.
ती जमीन समस्त गावची मालमत्ता आहे – मोहन नाथबुवा
सर्व्हे नं. 78, 88 या देवस्की जमिनीवर आपली नावे चढवून समस्त गावची मालमत्ता हडप केली आहे. ती समस्त गावची मालमत्ता आहे. जमीन मिळवून घेईपर्यंत आम्ही हा लढा असाच सुरू ठेवणार.
देवस्की जमीन समस्त ग्रामस्थांची जमीन आहे -पूजा सतीश पाटील
सर्व्हे नं. 78, 88 गावची देवस्थान जमीन गावाला मिळवून देण्यासाठी माझे पती सतीश पाटील ग्रामस्थांसमवेत लढा देत असतेवेळी 30 नोव्हेंबर 2020 रोजी विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले. देवस्की जमीन ही समस्त ग्रामस्थांची जमीन आहे. ती गावाला मिळेपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहे.
पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांची कोरोनाबद्दल जागृती
गौंडवाड येथे देवस्की जमिनीसंदर्भात शांतता बैठक सुरू असताना काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बैठकीमध्ये एखाद्याच्या तोंडावर मास्क नसेल तर त्याला त्वरित मास्क घालण्यास सांगत होते. कोरोना महामारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने मास्क घातलाच पाहिजे, असेही ते सांगत होते. भर पाऊस सुरू असूनसुद्धा आपल्या गावची जमीन मिळवून घेण्यासाठी पुरुष, महिला व युवक मोठय़ा संख्येने बैठकीला उपस्थित होते.