प्रतिनिधी / बेळगाव
येथील गौड सारस्वत बाह्मण समाज शहापूर, बेळगाव या समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सायंकाळी सिटी हॉल भाग्यनगर, टिळकवाडी येथे खेळीमेळीत पार पडली. व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष सुनील नाईक, सेक्रेटरी राघव हेरेकर, खजिनदार विकास कब्बे आणि विश्वस्त बालमुपुंद पतकी उपस्थित होते.
राघव हेरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून मागील सभेचा आणि विश्वस्त निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला आणि त्याला सर्वांची अनुमती घेण्यात आली. प्रारंभी गेल्या वार्षिक सभेनंतरच्या काळात दिवंगत झालेल्या समाजबांधवांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. हिशोब तपासणीस यांचेकडून आलेल्या जमाखर्च ताळेबंदला सभेची मंजुरी घेण्यात आली. वार्षिक अंदाजपत्रकही सभेपुढे मांडून त्याला मंजुरी घेण्यात आली.
कोरोना काळातही सर्व शासकीय नियमांचे पालन करून संस्थेने विविध सामाजिक उपक्रम वर्षभरात पार पाडल्याचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी सांगितले. राघव हेरेकर यांनी आभार मानले. सभेला बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.