जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर
प्रतिनिधी / कोल्हापूर
गौण खनिज परवाना त्वरीत द्यावा, या परवान्याची मुदत एक करावी,. यासह विविध मागण्यांसाठी `मी वडार महाराष्ट्राचा’च्या नेतृत्वाखाली दगड खाणमालक, स्टोन क्रशरधारक व डंपरमालकांनी भव्य डंपर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. यामध्ये जिह्यातून 80 हून अधिक डंपर व पाचशेहून अधिक आंदोलक सहभागी झाले होते.
संघटनेतर्फे सुरुवातीला गाढव मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु प्रशासनाने परवानगी न दिल्याने तो रद्द करण्यात आला. परंतु डंपर मोर्चा निर्धार कायम ठेवला. या मोर्चाला शियेफाटा येथून सुरुवात झाली. यामध्ये जिह्यातून 80 हून अधिक डंपर व पाचशेहून अधिक आंदोलक सहभागी झाले होते. पुणे-बेंगलोर महामार्गावरुन हा मोर्चा तावडे हॉटेल येथे आल्यानंतर मोजक्याच डंपरना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रवेश दिला जाईल, असे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यानुसार आंदोलक मोजकेच डंपर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले. या ठिकाणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनातील मागण्या अशा, स्थानिक सर्व वाहनांसाठी गौण खनिज परवाना पासचा स्विकार केला जावा. ऑनलाईन रॉयल्टी चलन भरले असता त्याचा स्विकार केला जावा, शासनाने गौणखनिज संदर्भात मशिनरी, वाहनांवर लाखो रुपये दंड आकारणी करण्यासाठी घेतलेला शासन निर्णय त्वरीत रद्द करावा, पूर्वीप्रमाणे फक्त गौणखनिजावर दंड आकारणी करावी व तोपर्यंत वाहनांवरील दंडाची कारवाई स्थगित करावी, मौजे टोप (ता. हातकणंगले) येथील गायरानात असलेल्या पडीक जमिनीमधील बेघर वडार समाज व कामगार यांची घरे कायम करुन त्यांचे पुनर्वसन करावे, वडार समाजास शासकिय जमिनीमध्ये उत्खननास त्वरीत परवाने मिळावेत, अशा शासकिय जमिनी वडार समाजासाठी पारंपारिक व्यवसाय करण्यास राखीव ठेवाव्यात, गौण खनिज यंत्रणेतील संबंधित दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी.
मोर्चात उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, तानाजी पोवार, मोहन पाटील, हणमंत पाटील, विश्वनाथ पाटील, रवी काशिद, साई लोले, रंगराव भोसले, प्रदीप पाटील, अरविंद गायकवाड, विजय तेरदाळकर, सचिन माळी, अविनाश कलकुटगी, सतीश नलवडे, शिवाजी चव्हाण, सुनील काटकर, अतुल जाधव, मारुती शिंगाडे आदी सहभागी झाले होते.