अदानी बनले आशियातील दुसऱया नंबरचे श्रीमंत
वृत्तसंस्था/ मुंबई
अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसऱया नंबरचे सर्वाधिक धनाढय़ व्यावसायिक बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 66.5 अब्ज डॉलर्स राहिली आहे. चालू वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये 33 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. म्हणजे जवळपास 100 टक्के वाढ झाल्याची नोंद केली आहे. सध्या आशियातील पहिल्या स्थानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी असून त्यांची एकूण संपत्ती ही 76.5 अब्ज डॉलर्स आहे, अशी माहिती ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने सादर केलेल्या अहवालात दिली आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये सलगची होत असणारी वाढ त्यांना फलदायी ठरू लागली आहे. संपत्ती वाढीत योगदान देत मुकेश अंबानी यांना मागे टाकण्याचा अदानी प्रयत्न करत असल्याचे पहावयास मिळत आहे. या दोघांच्या संपत्तीमध्ये जवळपास 10 अब्ज डॉलर्सचा फरक राहिला आहे.
चालू वर्षात अंबानींची संपत्ती घटली
चालू वर्षामध्ये अंबानींची संपत्ती 17.5 कोटी डॉलर्सने घटली आहे. तर दुसऱया बाजूला गौतम अदानी यांची संपत्ती मात्र 32.7 अब्ज डॉलर्सने वाढल्याची नोंद आहे. अदानींची संपत्ती मागील वर्षभरात मोठय़ा वेगाने वधारत गेली आहे. मे 2020 पासून आतापर्यंत त्यांच्या लिस्टेड कंपन्यांच्या समभागांनी मजबूत कामगिरी केल्याचे पहावयास मिळाले आहे.
आशियातील धनाढय़ व्यावसायिकांची संपत्ती (अब्ज डॉलरमध्ये)
उद्योगपत्ती संपत्ती
1.मुकेश अंबानी.. 76.5
2.गौतम अदानी. 66.5
3.झांग शनशान. . 63.6
4.मा हुआटेंग….. 60.5
5.जॅक मा 48.7