युवा-कनिष्ठ आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप – तीन खेळाडू उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठांच्या आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या गौरव सैनीने (70 किलो वजन गट) अंतिम फेरी गाठली तर अन्य तीन भारतीय बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
सैनीने किर्गिजस्तानच्या झाकिरोव्ह मुखम्मदअझिझवर 4-1 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळविला. युवा व कनिष्ठ पुरुष व महिलांची स्पर्धा प्रथमच एकाच वेळी घेतली जात आहे. उपांत्य फेरी गाठणाऱया भारतीय खेळाडूंत आशिष (54 किलो गट), अन्शुल (57 किलो गट), भरत जून (81 किलोवरील गट) यांचा समावेश आहे. आशिषने ताजिकिस्तानच्या रहमानोव्ह जाफरचा 5-0 असा धुव्वा उडविला तर अन्शुलने संयुक्त अरब अमिरातच्या मन्सूर खालीद पराभव केला. पहिल्या फेरीवेळीच रेफरींनी ही लढत थांबवत अन्शुलला विजयी घोषित केले. भरतने उझ्बेकच्या केनेसबाएव्ह आयनाझरचा 3-2 अशा निसटत्या फरकाने पराभव केला.
46 किलो वजन गटात क्रिश पालचे आणि 63 किलो गटात प्रीत मलिक यांचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. क्रिश पाल हा उझ्बेकच्या बख्तियार याखशिबोएव्हचा जोड ठरू शकला नाही. बख्तियारने पालवर इतके वर्चस्व गाजविले की, रेफरींनी दुसऱया फेरीतच लढत थांबवली. प्रीत मलिकला किर्गिजस्तानच्या एल्डर एसेम्बाएव्हकडून 2-3 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला.
या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला तेव्हाच भारताची किमान 20 पदके निश्चित झाली होती. कोव्हिडमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध असल्याने अनेक देशांनी या स्पर्धेपासून दूर राहणे पसंत केले. स्पर्धकांची संख्या कमी असल्यामुळे भारताची पदके आधीच निश्चित झाली होती. युवा विभागातील विजेत्यास 6000 डॉलर्स, रौप्यविजेत्यास 3000, कांस्यविजेत्यास 1500 डॉलर्स मिळणार आहेत तर कनिष्ठ विभागातील विजेत्यास 4000, रौप्यविजेत्यास 2000 व कांस्यविजेत्यास 1000 डॉलर्स बक्षीस दिले जाणार आहे.