वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरच्या ग्यानेंद्रो निन्गोम्बम यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मोहम्मद मुश्ताक यांनी राष्ट्रीय क्रीडा कार्यकाल आचारसंहितेचे उल्लंघन केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने त्यांना अध्यक्षपद सोडण्यास सांगितले होते. त्यांच्या जागी आता निन्गोम्बम यांची निवड झाली आहे.
मात्र मुश्ताक अहमद फेडरेशनमध्येच राहणार असून वरिष्ठ उपाध्यक्षपदी त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. हॉकी इंडियाची शुक्रवारी येथे बैठक व विविध पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. कोव्हिड 19 महामारीमुळे प्रवासावर निर्बंध घालण्यात आले असल्याने अनेक सदस्यांना या बैठकीस थेट उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना त्यात भाग घेण्याची संधी देण्यात आली होती. निन्गोम्बम हे ईशान्य भारत विभागातील हॉकी इंडियाचे पहिले अध्यक्ष बनले आहेत. गेल्या जुलैमध्ये मुश्ताक अहमद यांनी राजीनामा देत पद सोडल्यानंतर निन्गोम्बम हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांची दोन वर्षांसाठी या पदावर निवड झाली असून त्यांनी 2009-14 या कालावधीत मणिपूर हॉकीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. ते गेले दशकभर या खेळाशी निगडित राहिले आहेत.
2018 मध्ये झालेली अध्यक्षपदाची निवडणूक क्रीडा कार्यकाल आचारसंहितेचे उल्लंघन करणारी असल्याने मुश्ताक अहमद यांना क्रीडा मंत्रालयाने पद सोडण्यास आणि पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यास फेडरेशनला सांगितले होते. राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेनुसार, कोणत्याही पदावर सलग तीन वेळा राहता येत नाही. अहमद यांनी हॉकी इंडियाचे खजिनदार म्हणून 2010-14 या कालावधीत काम पाहिले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांची चार वर्षांसाठी हॉकी इंडियाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. 2018 मध्ये चार वर्षासाठी ते हॉकी इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे 2019 मध्ये हॉकी इंडियाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. पण ते खजिनदारपदी असताना क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता घेण्याची प्रथा त्यावेळी नव्हती. त्यामुळे त्यांचा कार्यकाल ठरवताना हा कालावधी विचारात घेता येणार नाही, असा युक्तिवाद हॉकी इंडियाने मांडला होता. मात्र क्रीडा मंत्रालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला होता. अहमद यांच्या कार्यकालात हॉकी इंडियातर्फे अनेक मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन झाले असून 2018 मधील विश्वचषक स्पर्धेचाही त्यात समावेश आहे.
शुक्रवारच्या बैठकीमध्ये हॉकी स्पर्धा पुन्हा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. 2021 मध्ये राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपने सुरुवात होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये तसेच कनिष्ठांच्या विश्वचषकामध्ये यशस्वी होण्यासाठी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळणे आवश्यक असल्याचे हॉकी इंडियाचे सरचिटणीस राजिंदर सिंग म्हणाले.