वार्ताहर / कडोली
लेझीम, टिपरी, ढोलताशा आणि टाळमृदंगाच्या गजरात थोर पुरुषांच्या पेहरावात सहभागी विद्यार्थ्यांनी कडोली मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी मोठय़ा उत्साहात पार पडली.
ग्रंथदिंडीचा मार्ग यावर्षी बदलून गावच्या मध्यवर्ती असलेल्या यल्लाम्मा मंदिरापासून सुरुवात झाली. प्रारंभी हभप महादेव जोतिबा बिर्जे यांच्याहस्ते पालखी पूजन झाल्यानंतर ग्रंथदिंडीला सुरुवात झाली.
शिवमुद्रा ढोलताशा ध्वज पथकाच्या ढोलताशाच्या गजराने ग्रंथदिंडीत अमाप उत्साह दिसून येत होता. सदर ग्रंथदिंडीत कडोलीतील कल्मेश्वर भजनी मंडळ, कल्मेश्वर वारकरी भजनी मंडळ, ज्ञानेश्वरी मंडळ हंदिगनूर, वारकरी मंडळ केदनूर यांच्या भजनाने सर्व साहित्यिक रमून गेले. थोर पुरुषांचे फलक घेतलेले आणि पेहराव केलेले विद्यार्थी गंथदिंडीत लक्षवेधून घेत होते.
तसेच प्राथमिक शाळा, शिवाजी हायस्कूल कडोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल केदनूर, सरस्वती हायस्कूल हंदिगनूर आदी शाळांचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी होऊन गंथदिंडीत शोभा आणली.
ग्रंथदिंडीत संमेलनाचे साहित्यिक संमेलनाध्यक्ष बालाजी जाधव, कवी अनंत राऊत, जितेंद्र लाड, तालिब सोलापुरी, कथाराम जीवन आकाराम सावंत, कडोली मराठी साहित्य संघाचे बाबूराव गौंडवाडकर, भरतकुमार भोसले, बसवंत शहापूरकर, अरूण पाटील, तानाजी कुट्रे, दिपक होनगेकर, देवाप्पा होनगेकर, बाबूराव नेसरकर, भरमाण्णा डोंगरे, संभाजी पवार, राजू पाटील, बाळासाहेब पाटील, उदय सिद्दण्णावर, शंकर चिंचनगी, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले
होते.
ग्रंथदिंडी संमेलनास्थळी आल्यानंतर सुवासिनांनी औक्षण केले. त्यानंतर ग्रंथ दालनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संतू बेळगावकर यांच्याहस्ते झाले.
त्यानंतर दीपप्रज्वलन करून उद्घाटन उद्यमबाग एसपीएम कंट्रोलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण सावंत यांच्याहस्ते केले. माधवराव भोसले स्मृती संमेलन मंडपाचे उद्घाटन जीवन भोसले यांच्याहस्ते, सांगाती व्यासपीठाचे उद्घाटन सांगाती, पतसंस्थेचे चेअरमन दयानंद सलाम, शिवप्रतिमा पूजन राजाराम ओऊळकर, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन ग्रा. पं. अध्यक्षा मनीषा पाटील, सरस्वती प्रतिमा पूजन संजय पाटील, महात्मा जोतिबा फुले प्रतिमा पूजन पुंडलिक पाटील तर कै. प्रा. तुकाराम पाटील प्रतिमा पूजन सतीश पाटील यांच्याहस्ते झाले. शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने स्वागत झाल्यानंतर संघाचे अध्यक्ष बाबूराव गौंडवाडकर यांनी प्रास्ताविकेत कडोली संमेलनाची परंपरा सांगून देणगीदार, पाठबळ देणाऱया सर्व संस्था व रसिकांना धन्यवाद दिले.
तत्पूर्वी साहित्यिक व मान्यवरांना पुष्पगुच्छ मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन गिरीधर गौंडवाडकर, सोनल मायाण्णाचे, भक्ती पाटील, किशोर पाटील यांनी केले. आभार भरमानी डोंगरे यांनी मानले. स्नेहभोजन कडोलीतील प्रगतशील शेतकरी सुलभा शंकर कुट्रे यांच्यावतीने स्नेहभोजनाची व्यवस्था केली. लज्जतदार भोजनाचा साहित्यिक व रसिकांनी आस्वाद घेतला.