विनयकुमार मंत्रवादी यांच्या ‘गोपाळ हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी / पणजी
लोकमान्य टिळकांनी पुस्तक हे मस्तक आहे, असे म्हटले होते. पुस्तक म्हणजेच ग्रंथ ते आपले खरे मित्र असतात आणि संस्कार करणारे गुरु तसेच पुस्तके हे नेहमीच प्रेरणा देणारी असतात, असे प्रतिपादन ‘तरुण भारत’चे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर यांनी केले.
समाजसेवक व निवृत्त प्राचार्य विनयकुमार मंत्रवादी यांच्या ‘गोपाळ हाजीर हो’ या मराठी आणि गरुडांचो गर्व’ या कोकणी पुस्तकाचे प्रकाश इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. विनयकुमार मंत्रवादी हे तसे नवोदित लेखक असले तरी त्यांनी आपल्या पुस्तकातून वाचकांना खूप चांगले संदेश दिलेले आहेत. ऐन कोरोनाच्या काळात प्रत्येकांनी स्वतःला घरात कोंडून घेतले असले तरी मंत्रवादी गप्प बसले नाहीत. त्यांनी त्यावेळेचा सदुपयोग करून वाचकांना संस्कारक्षम अशा कथा दिल्या. पौराणिक कालखंडातील प्रत्येक कथेमागून त्यांनी समाजात कसे वागावे याचा संदेश दिला. ‘गोपाळ हाजीर हो’ या कथेतील लेखकाची अनुमती आणि त्यातून निर्माण झालेल्या भावार्थावर जावडेकर यांनी भाष्य केले. मंत्रवादी यांनी या पुस्तकांद्वारे वाचकांना खूप माहिती पुरविली आहे. संस्कारक्षम शिक्षणही दिल्याबद्दल जावडेकर यांनी मंत्रवादी यांचे अभिनंदन केले.
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘गरुडाचो गर्व’ या कोकणी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर खास वक्ते म्हणून डॉ. प्रवीण गावकर उपस्थित होते.
मंत्रवादी यांच्या कथा या साध्या व सोप्या भाषेतील आणि त्या प्रत्येकाला भावतील अशाच आहेत. अनेक मंदिरात भेटी देताना त्यांच्यातील भावोत्कार छटा त्यांनी पुस्तकात शब्दरुपी रेखाटलेल्या आहेत. जीवनाकडे पाहण्याचा मंत्रवादी यांचा दृष्टीकोन वेगळा आहे, असे डॉ. प्रवीण गावकर म्हणाले.
कोकणी-मराठी या भाषा भगिनी : गोरख मांद्रेकर
अध्यक्षस्थानावरून बोलताना इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर यांनी कोकणी-मराठी या भाषा भगिनी आहेत. मंत्रवादी यांनी दोन पुस्तकांद्वारे दोन्ही भाषांना एकत्र आणण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. दोन्ही पुस्तके ही वाचनीय आहेत आणि जीवनात संयम राखूनच वागण्याचा कानमंत्र मंत्रवादी यांनी त्यातून दिल्याचे प्रतिपाद मांद्रेकर यांनी केले व मंत्रवादी यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
समाजात आज संस्काराची गरज : विनयकुमार मंत्रवादी
लेखक विनयकुमार मंत्रवादी व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मी मंत्रवादी या व्यासपीठावर उपस्थित होत्या. आपल्या स्वागतपर भाषणात मंत्रवादी यांनी अनेक पौराणिक कथांनी आपल्यावर संस्कार केले. आपल्याला ज्या कथा समजल्या व उमजल्या त्या जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या इराद्याने व समाजात आज संस्काराची गरज असल्याने कोरोना काळात आपण हे काम केल्याचे निवेदन केले.
सौ रिना मंत्रवादी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कु. आर्या व शाश्वत यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. उर्वीजा महेश नागवेकर यांनी ईशस्तवन आणि अखेरीस पसायदान सादर केले. लोकमान्य प्रेसचे सुदेश बोरकर यांच्याहस्ते सूत्रनिवेदन करणाऱया सौ. सुचेता नायक शिंक्रे व सौ. सुनिता फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. गुरुप्रसाद मंत्रवादी यांनी आभार मानले. यावेळी मोठय़ा संख्येने लेखक, वाचक व मंत्रवादी यांची हितचिंतक मंडळी उपस्थित होती.