प्रतिनिधी / जयसिंगपूर
शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी स्वीकारले असून अनेक ठिकाणी आपले वर्चस्व राखण्यात यड्रावकर यांना यश मिळाले आहे.
33 ग्रामपंचायती पैकी 23 ठिकाणी सत्ता मिळवण्यात यड्रावकर यशस्वी ठरले आहेत. शिरोळ तालुक्यातील 53 पैकी 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना 23 ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यास बळ मिळाले आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणी दरम्यान कुटवाड, हसुर, गौरवाड, गणेशवाडी, जैनापूर, दानोळी, तमदलगे, नांदणी, निमशिरगाव, कोंडिग्रे, नृसिंहवाडी, शिरदवाड, जुने दानवाड, आलास, मजरेवाडी, टाकळीवाडी, अर्जुनवाड, घालवाड, कवठेगुलंद, बुबनाळ, यड्राव व दत्तवाड येथे यड्रावकर समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत तर बस्तवाड, उदगाव, कोथळी, तेरवाड, शिरटी, चिपरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना विजयी ठरली आहे तर काँग्रेसने तेरवाड, धरणगुत्ती, जांभळी व शेडशाळ येथे आपला करिष्मा दाखवला आहे.