वार्ताहर/ निपाणी
ग्रामीण भागाचे प्रमुख सत्ताकेंद्र असणाऱया ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. जिल्हय़ात दुसऱया टप्प्यात निपाणी, चिकोडी, रायबाग, कागवाड, अथणी, सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्यात मतदान होणार आहे. शनिवारी रात्रभर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी धावपळ करताना एकेका मताचे नियोजन केल्याचे चित्र गावपातळीवर पहावयास मिळत होते. बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस आणि भाजप पुरस्कृतसह तिसऱया आघाडीने एकमेकांविरोधात उमेदवार दिल्याने तुल्यबळ लढती लागल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार तालुका प्रशासनाने निवडणुकीची जय्यत तयारी केली असून 30 रोजी मतमोजणीतून निकाल घोषित होणार आहे.
ग्रामपंचायतींचा कार्यकाळ गेल्या एप्रिल-मे महिन्यात संपला. हा कार्यकाळ संपण्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. पण याच काळात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमून अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलल्या. पण याच दरम्यान निवडणूक आयोगाने प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करुन इच्छुकांना तयारी करण्याकरिता संधी दिली.
याच संधीचा फायदा उठवत अनेकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष तयारी करताना रणशिंग फुंकले. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याची आकडेवारी पुढे येत गेली. सर्वांनीच कोरोना संसर्गाची भीती सोडली. तोच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 रोजी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक अधिसूचना लागू करत दोन टप्प्यात होणाऱया मतदानाच्या तारखा जाहीर केल्या. पहिल्या टप्प्यात 22 रोजी मतदान झाले असून दुसऱया टप्प्यासाठी आज 27 रोजी मतदान होत आहे.
निवडणूक तारीख निश्चित झाल्यापासून ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले. दुसऱया टप्प्यासाठी 19 रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊन चिन्हांचे वाटप होताच खऱया अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. यामध्ये पक्षीय राजकारण नसले तरी भाजप, काँग्रेस पुरस्कृत आघाडय़ांसह तिसऱया आघाडीनेही निवडणुकीत रंगत वाढविताना चुरस वाढविली. उमेदवार, स्थानिक नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप यामुळे रणांगण तापून तप्त झाले. आज या सर्व बाबी मागे पडणार असून मतदार राजा आपल्या मताचे दान पेटीबंद करणार आहे 30 रोजी मतमोजणी होणार असून प्रचारात गुंतलेल्या उमेदवार, कार्यकर्ते व नेत्यांना आकडेमोड करिता वेळ मिळणार आहे.
चिकोडीत 35 ग्रा. पं.साठी 667 उमेदवार
चिकोडी तालुक्मयातील 35 ग्रामपंचायतींसाठी एकूण 667 सदस्य निवडले जाणार होते. त्यापैकी 42 जागा बिनविरोध करण्यात आल्या असून 753 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 625 जागांसाठी निवडणूक होत असून 1628 जण रिंगणात आहेत. चिकोडी तालुक्मयात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 2 लाख 6 हजार 33 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1 लाख 1 हजार 151 महिला तर 1 लाख 4 हजार 880 पुरुषांचा समावेश आहे. एकूण 224 प्रभागात मतदान करण्यासाठी 302 मतदान केंदे सज्ज ठेवण्यात आली आहेत. मतदारांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मतदान केंदे सुरू करण्यात आली आहेत.
निपाणीत 27 ग्रा. पं.साठी 481 उमेदवार
निपाणी तालुक्यात 27 ग्रामपंचायती असून 55 हजार 596 मतदार आहेत. उमेदवार संख्या 481 आहे. यासाठी 1261 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चुरशीने होणाऱया या निवडणुकीत भाजप-काँग्रेस आघाडींसमोर काही ठिकाणी तिसऱया आघाडीने तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी आव्हान निर्माण केले आहे. लागलेली चुरस लक्षात घेऊन मतदानाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वादावादीतून मारामारीचे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने सुरक्षेची काळजी घेतली आहे. यासाठी अधिकच्या 300 पोलिसांना इतर तालुक्यातून पाचारण करण्यात आले आहे.