प्रतिनिधी / वास्को :
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कासावली भागातील रेल मार्ग दुपदरीकरणाचा वाद चिघळू लागला आहे. गुरूवारी या मार्गासंबंधी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या शासकीय आणि रेल्वे अधिकाऱयांना लोकांच्या विरोधामुळे सर्वेक्षण न करताच माघारी परतावे लागले. स्थानिक आमदार एलिना साल्ढाना या विरोधासाठी आघाडीवर होत्या. लोकांना विश्वासात न घेता सर्वेक्षण करण्यात येत असल्याने हे सर्वेक्षण रोखण्यात आले.
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मडगाव ते वास्कोपर्यंतच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी रेल्वेने सर्व सज्जता ठेवलेली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी या मार्गाचे सर्वेक्षण होत आहे. मात्र, मुरगाव तालुक्यातील कासावली, वेलसाव या भागातील नागरिकांचा या दुपदरीकरणाला तीव्र विरोध असून मागच्या चार पाच वर्षांपासून स्थानिक लोकांनी विविध कारणास्तव रेलमार्गाच्या या विस्ताराला विरोध केलेला आहे. या विस्तारीकरणासाठी सध्या रेल्वेनेही हालचाली वाढलेल्या आहेत. याचा परीणाम म्हणून त्या गावांमधील रेल्वविरोधी वातावरणही तापलेले आहे. त्यामुळे गुरूवारी रेलमार्ग दुपदरीकरणाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या रेल्वे व अन्य शासकीय अधिकाऱयांनाही वाईट अनुभव आला. त्यांना सर्वेक्षण न करताच माघारी परतावे लागले.
दोन दिवसांपूर्वीच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य सरकारने दक्षिण पश्चिम रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी जमीन बहाल करण्याच्या प्रक्रियेला मान्यता देऊन या प्रकल्पाला हीरवा कंदील दाखवलेला आहे. मात्र, याच सरकारमधील स्थानिक आमदार एलिना साल्ढाना यांनी या प्रश्नावर आपल्याच सरकारशी संघर्ष करण्याची तयारी ठेवल्याचा संशय येत आहे. गुरूवारी रेल्वेच्या अधिकाऱयांनी कासावलीतील रेल्वे स्थानकावर सर्वेक्षणास प्रारंभ करताच गावातील इतर लोकांसमवेत आमदार एलिना साल्ढाना यांनीही आक्षेप घेतला. गोंयच्या रापणकारांचो एकवोटचे नेते ओलान्सीयो सिमाईस यावेळी उपस्थित होते. हे सर्वेक्षण आता येत्या 7 रोजी सकाळी लोकांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार आहे.